कतार - फिफा विश्वचषकाच्या(FIFA World Cup) दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोच्या स्वप्नांचा धुरळा करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता फायनलमध्ये फ्रान्सचा सामना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होणार आहे. मोरोक्कोने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे परंतु फ्रान्सविरुद्ध त्यांची मजबूत फळी कोसळली. फ्रान्सने हा सामना २-० ने जिंकला.
या विजयासह फ्रान्स संघाने फिफा विश्वचषकात मोठा विक्रम केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात ६० वर्षानंतर गतविजेता सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. यापूर्वी, १९५८ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर, ब्राझील संघाने १९६२ च्या अंतिम फेरीतही विजेतेपद टिकवण्यासाठी मैदानात उतरली होती. दुसरीकडे, मोरोक्कोचे फिफा विश्वचषक खेळण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. फिफा विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा आफ्रिकन देशांतील पहिला संघ ठरला आहे. तो अंतिम फेरीत पोहोचला नसला तरी मोरोक्कोने स्पर्धेत आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली.
पाचव्या मिनिटाला मोरोक्कोवर मात मोरोक्कोविरुद्ध उपांत्य फेरी खेळण्यासाठी उतरलेल्या फ्रान्स संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. याचा परिणाम असा झाला की, खेळाच्या पाचव्या मिनिटाला थिओ हर्नांडेझने संघासाठी गोल करून खळबळ उडवली. यानंतरही फ्रान्स खेळाडू सातत्याने गोलपोस्टवर खेळत राहिले. अशाप्रकारे फ्रान्सचा संघ पहिल्या हाफमध्ये १-० ने पुढे होता. खेळाच्या दुसऱ्या हाफमध्ये ७९व्या मिनिटाला फ्रान्सने आणखी एक गोल करत ही आघाडी दुप्पट केली.
फ्रान्ससाठी रँडल कोलो मुआनीने हा गोल केला. रँडल पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला. मैदानावर आल्यानंतर केवळ ४४ सेकंदातच त्याने गोल केला. यानंतर फ्रान्सने मोरोक्कोला एकही संधी दिली नाही आणि अंतिम फेरीपर्यंत २-० अशी आघाडी कायम ठेवली. पहिल्या हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करूनही फ्रान्स खेळाडूंना मोरोक्कोला कोणतीही मोकळीक द्यायची नव्हती. यामुळेच खेळाच्या पूर्वार्धात फ्रान्स संघाने एकूण १० शॉट्स मारले ज्यात त्यांना यश मिळाले. मोरोक्कोबद्दल सांगायचे तर त्यांना एकूण पाच संधी मिळाल्या त्यापैकी दोन टार्गेटवर होते पण तो गोल पोस्टच्या आत जाऊ शकला नाही.