अल थुमामा (कतार) : यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील तिसरा अनपेक्षित निकाल नोंदवताना मोरोक्कोने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बलाढ्य बेल्जियमला २-० असे नमवले. यासह मोरोक्कोने सर्वाधिक ४ गुणांसह ‘फ’ गटात अव्वल स्थान पटकावले. मोरोक्कोने सलामीला क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. बेल्जियमने कॅनडाला नमवून विजयी सुरुवात केली होती.
याआधी, सौदी अरबने अर्जेंटिनाला, तर जपानने जर्मनीला नमवून यंदाची विश्वचषक स्पर्धा गाजवली. मोरोक्कोने या शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धा इतिहासातील आपला केवळ तिसरा विजय मिळविला. १९९८ साली मोरोक्कोने स्कॉटलंडला ३-०, तर १९८६ साली पोर्तुगालला ३-१ असे पराभूत केले होते. बेल्जियमने चेंडूवर ६७ टक्के नियंत्रण राखताना गोल करण्याच्या १० संधी निर्माण केल्या. मोरोक्कोनेही गोल करण्याच्या १० संधी निर्माण करत चारवेळा गोलजाळ्याचा वेध घेतला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करत गोलशून्य बरोबरी साधली होती. दुसऱ्या सत्रात बेल्जियमकडून आक्रमक पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, मोरोक्कोच्या बचावफळीने शानदार खेळ करत बेल्जियमला यशस्वी होऊ दिले नाही. अब्देलहमीद साबिरीने ७३व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर दबावात आलेल्या बेल्जियमकडून अनेक चुका झाला. निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्याच मिनिटाला झकारिया अबौखलाल याने बेल्जियमच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत अप्रतिम गोल करत मोरोक्कोचा विजय निश्चित केला.
मोरोक्कोने दुसऱ्यांदा विश्वचषक सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. विश्वचषक सामन्यातील पहिल्या सत्रात गोल न केल्यानंतरही विजयी होण्याची मोरोक्कोची पहिलीच वेळ.अब्देलहमीद साबिरी हा विश्वचषक सामन्यात मोरोक्कोकडून फ्री किकवर थेट गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.विश्वचषक स्पर्धेत बेल्जियम-मोरोक्को दुसऱ्यांदा आमने-सामने आले आणि दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमचा आफ्रिकन संघाविरुद्ध पहिल्यांदाच पराभव झाला. विश्वचषक स्पर्धा इतिहासातील ५०वा सामना खेळताना पराभव पत्करणारा बेल्जियम हा इंग्लंड आणि स्पेननंतरचा तिसरा संघ ठरला.