मुंबई : आयपीएल-८च्या प्ले आॅफमध्ये धडक देण्यासाठी वाढती स्पर्धा असल्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना शनिवारी ‘करो वा मरो’ या इराद्यानेच मैदानात उतरावे लागेल.महत्त्वपूर्ण सामन्यात काल रात्री मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेल्या केकेआरला अखेरच्या चार संघांत कायम राहायचे असल्यास उद्याचा सामना जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. रॉयल्सलादेखील प्ले आॅफमध्ये खेळण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. केकेआरचे १३ सामन्यांत १५ गुण असून, रॉयल्स एका गुणाने मागे आहे. मुंबईच्या डावातील अखेरच्या पाच षटकांपर्यंत केकेआरची सामन्यावर पकड होती. मुंबईच्या त्यावेळी ४ बाद ७९ धावा होत्या. अखेरच्या पाच षटकांत ७२ धावा निघाल्या. केकेआरच्या विजयासाठी झुंज देणारा युसूफ पठाणने ३१ चेंडूंत सर्वाधिक ५२ धावा केल्या. पण तो बाद होताच केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात एकाही फलंदाजाला यश आले नाही. केकेआरची गोलंदाजी भक्कम आहे. उमेश यादव, मोर्ने मोर्केल, फिरकीत शकिब आणि सुनील नरेन हे खेळाडू आहेत. गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या रॉयल्सने १० मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना खेळला. त्यात त्यांचा पराभव झाला. सुरुवातीचे पाच सामने जिंकल्यानंतर रॉयल्सला किंग्ज पंजाबने सुपर ओव्हरमध्ये नमविले होते. दोन सामने पावसात वाहून गेले. (वृत्तसंस्था)
लढाई अस्तित्वाची...
By admin | Published: May 16, 2015 2:30 AM