ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या उपांत्य लढतीत इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले आहेत. या लढतीपूर्वीचा दोन्ही संघांमधील आकडेवारी पाहिली तर त्यात इंग्लंडचे पारडे जड आहे. मात्र महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ नेहमीच इंग्लंडला वरचढ ठरत आला आहे. अगदी 1992 च्या विश्वचषक स्पर्धेत जेव्हा पाकिस्तानने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती तेव्हासुद्धा अंतिम लढतीत इंग्लंडलाच पराभूत केले होते.
इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये 81 वेळा आमने-सामने आले. त्यापैकी तब्बल 49 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर 30 सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळाला आहे. उर्वरित दोन सामने अनिकाली राहिले. तर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या 39 लढतीत इंग्लंडने 26 सामने जिंकले, तर पाकिस्तानला केवळ 13 सामन्यांत विजय मिळवत आला आहे. आता आकडेवारी जरी इंग्लंडच्या बाजूने असली तरी पाकिस्तानचा संघ धक्कादायक निकाल नोंदवू शकतो. या स्पर्धेतही सर्वांचे अंदाज चुकवत या संघाने उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली आहे.
पाकिस्तानच्या तुलनेत इंग्लंडचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडयांवर सरस असल्याने विजयासाठी इंग्लंडला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. कारण साखळी गटातही इंग्लंडने आपले तिन्ही सामने सहज जिंकले आहेत. मात्र साखळी फेरीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला पराभूत करण्यात यश मिळवले होते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आजही ते यजमान इंग्लंडला धक्का देऊ शकतात.