नवी दिल्ली : आगामी विश्वचषकात आशियातील एकच संघ उपांत्य फेरीत दाखल होईल असे भाकीत वर्तवित १५ फेब्रुवारी रोजी आयोजित भारत-पाक लढत ही फायनलपूर्वीची ‘फायनल’ असेल, असे मत पाकचा माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर याने म्हटले आहे.महान लेगस्पिनर राहिलेला कादीर म्हणाला, ‘‘भारत आणि पाक हे ब गटात असून, अॅडिलेड येथे परस्परांविरुद्ध खेळतील. माझ्या मते आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिका हे उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार असून, चौथा संघ भारत-पाक लढतीद्वारे निश्चित होईल. जिंकणाऱ्या संघाचे मनोबळ उंचावेल; शिवाय बाद फेरी गाठण्याची शक्यता बळावेल.’’ मागचे रेकॉर्ड बघता सामन्यात भारताचे पारडे जड राहील ही बाब कादीरला मान्य नाही. त्याच्या मते उभय संघांना सारखीच संधी राहील. जो संघ धावांचा पाठलाग करेल त्या संघाला अॅडिलेड मैदानावर झुकते माप असेल, असे वाटते. भारताला वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग यांची उणीव जाणवेल, असेही कादीरचे मत आहे. तो म्हणाला, ‘‘सेहवाग आणि युवीसारख्यांना संघात स्थान नाकारण्यात आले याचे मला आश्चर्य वाटते. आशियातील संघांना अशा चुका करण्याची सवय झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर मानसिक दबाव येतो. हे दोन्ही खेळाडू असतील तर चार गोलंदाजांसह खेळण्याचा पर्याय उपलब्ध असतो. युवीने गेल्या विश्वचषकात डावखुरी गोलंदाजी करीत मोलाची भूमिका वठविली होती.’’टीम इंडियात लेग स्पिनर पीयूष चावला आणि अमित मिश्रा यांना स्थान मिळायला हवे होते, असे सांगून कादीर पुढे म्हणतो, ‘‘भारताकडे धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज नाहीत. फिरकी ही त्यांच्या जमेची बाजू आहे. चावला आणि मिश्रा यांना संधी मिळाली असती तर गोलंदाजी आणखी भक्कम बनली असती. (वृत्तसंस्था)भारताकडे महेंद्रसिंह धोनीसारखा चाणाक्ष कर्णधार आहे, पण अन्य खेळाडूंना सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल. केवळ कर्णधार संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. धोनी उत्कृष्ट कर्णधार असला तरी दहा खेळाडूंचे योगदानही तितेकच महत्त्वाचे राहील. तिरंगी मालिकेतील सामने मी पाहिले. ‘मॅचविनर’ अशी ख्याती असलेले कोहली आणि सुरेश रैना यांना चुकीच्या पद्धतीने बाद होताना पाहून मला फार वाईट वाटले.- अब्दुल कादीर
फायनलपूर्वीची ‘फायनल’: अब्दुल कादीर
By admin | Published: February 04, 2015 1:59 AM