ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 14 - श्रीलंकेचे दोन महान क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा आणि कुमार संगकारा यांच्यात सध्या शाब्दीक लढाई जुंपली असून, दोघांनी क्रिकेटप्रेमींच्या मनात संशय निर्माण होतील असे गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 2011 वर्ल्डकपचा भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला अंतिम सामना फिक्स होता. या मॅचची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अर्जुन रणतुंगा यांनी केली आहे. 53 वर्षीय रणतुंगा सध्या श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री आहेत.
त्याचवेळी कुमार संगकाराने 2009 चा श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा कोणाच्या सांगण्यावरुन ठरवण्यात आला होता त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2009 सालच्या पाकिस्तान दौ-यात श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सकाळच्या समयी खेळाडू बसने स्टेडियमकडे निघाले असताना दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये सहा पाकिस्तान पोलीस ठार झाले तर, काही खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर कुठल्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नाही.
आणखी वाचा
बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी
ख्रिस गेलनं भारतात खरेदी केली कंपनी
सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील
त्याचवेळी रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली खेळणा-या श्रीलंकेच्या संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. महेला जयवर्धनेच्या नाबाद (103) धावांच्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य दिले. गौतम गंभीरच्या (97) आणि महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद (91) धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केले.