ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सुंग जि ह्युनवर 21 -18, 14-21 आणि 21-14 अशी मात केली. उपांत्यफेरीच्या या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सिंधूला थोडा संघर्ष करावा लागला.
सिंधूने पहिला गेम जिंकल्यानंतर दुस-या गेममध्ये तिने लय गमावली. सुंगने दुसरा गेम जिंकून सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे सामना रंगतदार बनला. तिस-या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासून आघाडी घेतली व शेवटपर्यंत टिकवली. त्यामुळे तिला विजय मिळवता आला. घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचाही सिंधूला फायदा झाला.
सिंधूने काल फुलराणी सायना नेहवालला पराभूत केले होते. सरळ दोन सेटमध्ये सिंधूने हा विजय मिळवला होता. अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला फ्रान्सच्या कॅरोलिना मारीनशी होणार आहे. रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत रोमहर्षक सामन्यात कॅरोलिनाने सिंधूवर मात करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.