ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 16 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी फक्त दोन दिवस बाकी असताना दोन्ही देशांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भारत - पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमने-सामने येत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज आमीर सोहेलने मात्र मॅच फिक्सिंग करत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला असल्याचा आरोप केला आहे. आमीर सोहेलच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.
आमीर सोहेलने पाकिस्तानी न्यूज चॅनेलशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. आमीर सोहेलने मॅच फिक्सिंगवर स्पष्ट असं वक्तव्य केलेलं नाही. मात्र बोलताना अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या विजयामागे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप त्याने केला आहे. "पाकिस्तानी संघ आणि कर्णधार सर्फराज अहमदला अशाप्रकारे जास्त आनंद साजरा करण्याची गरज नाही. हा संघ आपल्या खेळाच्या जोरावर नाही तर बाहेरील कारणांमुळे चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायलनमध्ये पोहोचला आहे", असं वक्तव्य आमीर सोहेलने केलं आहे.
"तुम्ही कोणतं महान काम केलेलं नाही हे सर्फराजला सांगण्याची गरज नाही. कोणीतरी दुस-याने सामने जिंकण्यात तुमची मदत केली आहे. यामुळे जास्त आनंदी होण्याचं तुमच्याकडे कारण नाही. पडद्याच्या मागे काय चालू आहे सर्वांना माहित आहे. या खेळाडूंना इथपर्यंत आणण्यात आलं आहे. कोणी यांच्यासाठी सामने जिंकले याचा माग काढण्याची गरज नाही. मला विचाराल, तर मी सांगेन की चाहते आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे ते जिंकलेत", असं आमीर सोहेल बोलला आहे.
पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने सांगितलं की, "पाकिस्तानी संघ मैदानावर खेळल्याच्या जोरावर इथपर्यंत आलेले नसून, यासाठी मैदानाबाहेरील काही कारणे आहेत. ज्यांनी त्यांना फायलनमध्ये पोहोचवलं आहे. आता खेळाडूंना चांगला खेळ करण्यावर लक्ष दिलं पाहिजे". वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर आमीर सोहेलने पलटी मारत आपल्या या व्हिडीओचा संदर्भ वेगळा होता असा दावा केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणा-या सेमीफायनआधीचा हा व्हिडीओ असल्याचं ते सांगत आहे.