आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेआॅफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. प्लेआॅफचे स्वप्न दृष्टिक्षेपाच्या पलीकडे गेलेल्या गुजरातने रविवारी पंजाबला हरवून त्यांची वाट खडतर केली. आता पंजाबला उर्वरीत सामने जिंकावे लागतील. माझ्या मते, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या तीन संघांचे प्लेआॅफमध्ये पोहोचणे नक्की आहे, चौथ्या क्रमांकावर उरलेल्या संघांपैकी हैदराबादला चांगली संधी आहे. आता या चार संघांचा टॉप टूमध्ये येण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण टॉप टू संघाला फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतात. गुणतालिकेतील अव्वल संघांच्या कामगिरीकडे पाहिल्यास त्यांनी खडतर परिश्रम केल्यामुळेच ते तेथे पोहोचले असल्याचे लक्षात येते. त्यांची वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी चांगली आहे, संघात एकजुटीची भावना रुजली आहे. बेन स्टोक्स आणि इम्रान ताहिर हे दोन खेळाडू शेवटच्या टप्प्यात परत जाणार असल्यामुळे पुणेसारख्या संघांना थोडासा त्रास होऊ शकतो. त्यांची कमतरता भरून काढण्याचे आव्हान संघव्यवस्थापनापुढे असू शकते. शिवाय त्यांचे चाहतेही त्यांना मिस करतील.कामगिरीचा विचार करता या वेळी सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे ती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. संघातील खेळाडूंच्या नामावलीवर नजर टाकली, की अनेक महान खेळाडूंची नावे त्यात दिसतात, पण विराट कोहली, ख्रिस गेल, ए. बी. डिव्हीलियर्स या दिग्गज खेळाडूंपैकी एक जणही चालू शकला नाही. गोलंदाजीतही निराशाच झाली. बँगलोरने ज्याप्रमाणे एकापाठोपाठ एक सामने हरले ते पाहता, केवळ स्टार खेळाडू संघात असले तर ते सामने जिंकून देतील, याची खात्री देता येत नाही. बँगलोरच्या फलंदाजीला कोणते दुखणे लागले आहे, हे समजून आले नाही, पण त्यामुळे गेल्यावर्षीचा उपविजेता असलेला संघ यंदा तळाच्या स्थानावर आहे. बँगलोरबरोबच दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही थोड्याफार प्रमाणात निराशा केली आहे. एका सामन्यात त्यांच्या ऋषभ पंत, संजू सॅमसन यांच्यासारख्या युवा खेळाडूंची कामगिरी पाहिली तर हा संघ चॅम्पियन असल्यासारखा भासतो, पण पुढच्याच सामन्यात हा संघ शंभरच्या आत गारद होतो. कामगिरीतील असातत्य हे त्यांच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणावे लागेल. सातत्याचा विचार केल्यास मुंबई आणि केकेआर या संघाने ते टिकवून ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल. केकेआरने केलेला प्रायोगिक जुगार प्रचंड यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. सुनील नरेनला सलामीला पाठवण्याची त्यांची कल्पना भन्नाट यशस्वी झाल्याचे दिसते. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम नरेनने केला आहे. मुंबई इंडियन्स संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करून अव्वल स्थानापर्यंत मुसंडी मारली आहे. अनेक अवघड सामने त्यांनी लिलया जिंकले आहेतच शिवाय अटीतटीच्या लढतीत मुंबई संघ ज्याप्रमाणे खेळतो आणि जिंकतो ते निश्चितच कौतुकास्पद आहे. पुणे आणि हैदराबादने आपल्या होमग्राऊंडवर चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या मैदानात ते अपयशी ठरल्याचे दिसतात.
IPL 10 - विराट कोहलीच्या बँगलोरने केली पार निराशा - अयाझ मेमन@cricketwallah@ashjaintweetspic.twitter.com/9QnXDBd94P— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) May 8, 2017