ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 16 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडणार असल्याने दोन्ही देशांमधील चाहते प्रचंड उत्सुक आहेत. भारत नेहमीप्रमाणे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पराभव करुन चॅम्पिअन्स ट्रॉफी आपल्या नावे करेल असा विश्वास चाहत्यांना आहे. मात्र भारतीय चाहत्यांसाठी टेंशन वाढवणारी एक बातमी आली आहे. ज्याच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी आहे तो कर्णधार विराट कोहली पुर्णपणे फीट नाही आहे. त्याची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. कोहलीला डोकेदुखीचा त्रास जाणवत असून, त्याला औषधं घ्यावी लागत आहेत.
विराटला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होत असून यासाठी त्याने फिजिओंकडून औषधं घेतली आहेत. विराटची डोकेदुखी थांबली नाही तर हीच डोकेदुखी भारतीय संघाला होऊ शकते. बांगलादेशविरोधात झालेल्या सेमीफायनल सामन्यात विराटने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अंतिम सामन्यात विराटची उपस्थितीही तितकीच महत्वाची असणार आहे. त्यात सामना पाकिस्तानविरोधात असल्याने विराट मैदानावर असणं संघाचं मनोबल वाढवण्यासाठी उपयोगी होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.
तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना मैदानावरील पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानदरम्यान पार पडणार आहे. ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे.