पणजी : देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वसंग्रामाची जंगी फायनल कोलकात्यात रंगणार आहे. नवी मुंबई आणि गुवाहाटी या केंद्रांना सेमीफायनलसाठी निवडण्यात आले आहे. मडगाव (गोवा) हे ‘क’ गटातील सामन्यांचे स्थानिक मैदान असेल. याबरोबरच ‘राउंड १६’ मधील दोन सामने आणि एक उपांत्यपूर्व सामनाही येथे होईल. कोची हे ‘ड’ गटातील सामन्यांचे केंद्र असून येथे एक उपांत्यपूर्व लढत होईल. ‘फिफा’चे शिष्टमंडळ सध्या भारतात असून, त्यांनी देशातील सहा केंद्रांची पाहणी केली. शिष्टमंडळाचे प्रमुख जेमी यार्जा यांनी सोमवारी ही घोषणा केली. या विश्वसंग्रामातील सामने कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, मडगाव, कोची आणि नवी मुंबई येथे होतील. तब्बल ८५ हजार प्रेक्षक क्षमता असलेले विवेकानंद युवा भारती क्रीडांगण कोलकाता हे तिसऱ्या स्थानाच्या प्ले आॅफ मॅचसाठी निवडण्यात आले. येथे ‘फ’ गटातील सहा सामने होतील. या मैदानास कोटी रुपये खर्च करून नवे रूप देण्यात आले आहे. उपांत्य सामन्यांसाठी मुंबई येथील डी.वाय. पाटील आणि गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमची निवड करण्यात आली. डी.वाय. पाटील मैदान हे ‘अ’ गटाचे स्थानिक मैदान असेल. गुवाहाटी हे ‘ई’ गटाचे केंद्र असून येथे ‘राउंड १६’ सामने आणि एक उपांत्य सामना होईल. स्पर्धेचा ‘ड्रॉ’ ७ जुलैला होईल. (वृत्तसंस्था)म्हणून कोलकात्याची निवड...भारतात होणारी ही एक स्पर्धा नसून हा फुटबॉल महोत्सव आहे. आॅक्टोबर हा उत्साहाचा महिना असल्याने आम्ही त्याला महोत्सवाचे रूप देणार आहोत. आम्हाला डी.वाय. पाटील स्टेडियम पसंत आहे; परंतु सॉल्ट लेक स्टेडियमवर जे आम्ही पाहिले ते आमच्या नजरेत अधिक उतरले. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, कोलकात्यातील या स्टेडियमवर होणारा अंतिम सामना यादगार असा असेल, फिफा शिष्टमंडळ प्रमुख यार्जा यांनी सांगितले.
कोलकात्यात होणार फायनल
By admin | Published: March 28, 2017 1:17 AM