लंडन : विक्रमी आठव्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवताना विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अकराव्यांदा प्रवेश केला. त्याआधी क्रोएशियाच्या मरिन सिलिच याने कारकिर्दीत पहिल्यांदाच विम्बल्डनची गाठली. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत फेडरर - सिलिच भिडतील. फेडरर दुखापतीतून सावरल्यानंतर तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्टे्रलियन ओपन जिंकल्यानंतर सलग तीन एटीपी विजेतेपद उंचावले. यंदाच्या विम्बल्डनमध्येही त्याने धडाक्यात सुरुवात करताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला होता. एकीकडे अँडी मरे, नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल हे कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्य फेरीआधीच स्पर्धेबाहेर गेले असताना फेडररने जबरदस्त खेळ करताना पुन्हा एकदा आपल्या खेळातील सातत्य सिद्ध केले. उपांत्य फेरीत ३५ वर्षीय फेडररने झेक प्रजासत्ताच्या ३१ वर्षीय थॉमस बर्डिचचे कडवे आव्हान ७-६(७-४), ७-६(७-४), ६-४ असे परतावले. २ तास १८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिले दोन्ही सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर ही लढत फेडररला काहीशी कठिण जाणार असे दिसत होते. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये त्याने सातवा गेम जिंकताना बर्डिचची सर्विस भेदून निर्णायक आघाडी घेतली. यानंतर सामना आणखी लांबणार नाही याची काळजी घेत फेडररने सहजपणे अंतिम फेरी गाठली. तत्पूृवी, पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम सिलिचने गाठताना अमेरिकेच्या सॅम क्युरे याला नमवले. २ तास ५६ मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिलिचने क्युरेला ७-६(८-६), ४-६, ७-६(७-३), ७-५ असे पराभूत केले. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या क्युरेची वाटचाल लक्षवेधी ठरली. त्याने उपांत्यपुर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अँडी मरेला धक्का देत खळबळ माजवली होती. त्यामुळे सिलिचपुढे आव्हान कठिण होते. परंतु, अमेरिकन ओपन विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिलिचने आपल्या तुफान सर्विसच्या जोरावर क्युरेला अडचणीत आणले. सिलिचने आज विक्रमाची नोंद करत विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा क्रोएशियाचा तो दुसरा खेळाडू बनला आहे. (वृत्तसंस्था)
फेडरर विरुद्ध सिलिच यांच्यात रंगणार फायनल
By admin | Published: July 15, 2017 12:55 AM