मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळामुळे आज अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे सर्व प्रश्न ऐकायला चांगले वाटतात. मात्र, माझ्या मते यावर दीर्घकालीन उपाय शोधणे गरजेचे आहे. ‘आयपीएल’चे काही सामने न खेळवून यावर तोडगा निघणार नाही, असे स्पष्ट मत राइजिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मांडले. मुंबईमध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात धोनी बोलत होता. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या आयपीएल महाराष्ट्राबाहेर खेळविण्याबाबत वाद होत आहे. यावर धोनी म्हणाला की, ‘सामन्यांचे ठिकाण बदलण्याने दुष्काळसारखा गंभीर प्रश्न सुटणार नाही. यावर आपल्याला दीर्घकालीन उपाय शोधावा लागेल. पाच ते सहा सामने किंवा एक पूर्ण मोसम न खेळविणे हे यावरील उपाय नाहीत.’ जेथे पाण्याची कमतरता आहे, तेथे पाणी पोहोचविण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकू, हे पाहणेही महत्त्वाचे आहे,’ असेही धोनीने यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)> याहून शानदार सुरुवात होऊ शकत नाही : धोनीमुंबई : गतविजेत्या बलाढ्य मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानात नमवून आयपीएलच्या नवव्या सत्राची विजयी सुरुवात केल्यानंतर, ‘‘याहून शानदार सुरुवात होऊ शकत नाही,’’ अशा शब्दांत राइजिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला आनंद व्यक्त केला. सामना झाल्यानंतर धोनीने प्रतिक्रिया दिली की, ‘‘माझ्या मते, याहून चांगली स्पर्धेची सुरुवात होऊ शकत नाही. गोलंदाजांना विजयाचे खूप श्रेय जाते. खास करून रजत भाटियाने चांगली कामगिरी केली. त्याने अचूक टप्प्यावर मारा केला.’’ यावेळी धोनीने सामनावीर ठरलेल्या अजिंक्य रहाणेचेही कौतुक केले.‘‘जेव्हा कमी धावसंख्येचे लक्ष्य असते तेव्हा फलंदाजांचे काम सोपे होते. जेव्हा कधी आॅफ साइडला चेंडू येतो तेव्हा रहाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे पटते. तो पारंपरिक फलंदाज असून ज्या पद्धतीने त्याने सामना संपवला ते शानदार होते,’’ असे धोनी म्हणाला.> अश्विनला केवळ एक षटक देण्यावरुन चर्वितचर्वणमुंबई : स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला या लढतीत केवळ एक षटक मिळण्याचा निर्णय आश्चर्यचकित करणारा होता. पुणे संघाचा कर्णधार धोनीने विश्वकप स्पर्धेत अश्विनला केवळ दोन सामन्यात पूर्ण षटके गोलंदाजी करण्याची संधी दिली. अश्विनने पाकविरुद्ध तीन आणि आॅस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी दोन षटके टाकली. धोनीने अश्विनच्या आयपीएल कारकिर्दीदरम्यान चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. आता पुणे संघाचे नेतृत्वही धोनीकडे आहे, पण या लढतीत जगप्रसिद्ध अश्विन ऐवजी धोनीने कारकिर्दीत यापूर्वी केवळ ११ सामने खेळणाऱ्या अश्विनकडे चेंडू सोपवला. रविचंद्रन अश्विनला १६ व्या षटकात गोलंदाजी मिळाली. त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. रविचंद्रनचा या लढतीतील हा एकमेव ओव्हर होता. याबाबत एका कार्यक्रमात त्याला पत्रकारांनी छेडले असता, धोनी म्हणाला, ‘अश्विनने अनेकदा मला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत केली आहे. तो कधीही संघासाठी गोलंदाजी करण्यास तयार असतो,’ अशा शब्दांत धोनीने रविचंद्रन अश्विनचे कौतुक केले. धोनी म्हणाला की, ‘अश्विन कोणत्याही वेळेला गोलंदाजीस तयार असतो. शिवाय त्यावेळी मुंबई इंडियन्सचे बहुतांश मुख्य फलंदाज बाद झाल्याने खालच्या फळीवर दबाव आलेला, तसेच स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मुरुगन अश्विनला यावेळी चांगली संधी होती. अशा परिस्थितीत पूर्ण चार षटके टाकण्यास देऊन त्याचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक होते.’
दुष्काळावर दीर्घकालीन उपाय शोधा : धोनी
By admin | Published: April 11, 2016 2:03 AM