मुंबई : दडपणाखाली खेळण्याच्या युवा क्रिकेटपटूंच्या क्षमतेमध्ये सुधारणा होण्याचे श्रेय आयपीएलला जाते, असे मत व्यक्त करणारा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने खेळाडूंच्या कामगिरीचे आकलन मात्र या टी-२० स्पर्धेपेक्षा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीवरून व्हायला पाहिजे, असे म्हटले आहे.गंभीर म्हणाला, ‘जर युवा खेळाडूंचा शोध घ्यायचा असेल तर केवळ प्रथम श्रेणी क्रिकेट बघायला पाहिजे. आयपीएलच्या तुलनेत प्रथम श्रेणी क्रिकेटला अधिक महत्त्व मिळायला पाहिजे.’गंभीर पुढे म्हणाला, ‘भारतीय चाहते आयपीएलला प्रथम श्रेणी क्रिकेटच्या तुलनेत अधिक महत्त्व देतात; पण कुठल्याही देशाचे प्रथम श्रेणी क्रिकेट आयपीएलपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण टी-२० क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंच्या कामगिरीचे आकलन करणे कठीण आहे. युवा खेळाडूंच्या कामगिरीचे आकलन टी-२० क्रिकेटमध्ये करता येत नाही. या प्रकारात युवा खेळाडूंना क्षमता सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळत नाही. आयपीएल मोठे व्यासपीठ आहे, यात वाद नाही. आयपीएलमध्ये खेळताना खेळाडूंवर चमकदार कामगिरी करण्याचे दडपण असते. ही स्पर्धा खेळाडूंच्या मानसिकतेची परीक्षा पाहणारी असते; पण तंत्राची परीक्षा मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये होते. त्यामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटला आयपीएलच्या तुलनेत अधिक महत्त्व मिळायला पाहिजे.’आयपीएलच्या आठव्या पर्वाबाबत बोलताना गंभीर म्हणाला, की सर्व दिग्गज संघांदरम्यान प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस दिसून येत आहे. गंभीरने केकेआर संघात पुनरागमन करणारा बांगलादेशचा माजी कर्णधार अष्टपैलू शाकिब अल-हसनचे स्वागत केले. शाकिबला पाकिस्ताविरुद्धच्या वन-डे व कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मायदेशी परतावे लागले होते. शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे गंभीरने या वेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
प्रथम श्रेणी क्रिकेट महत्त्वाचे : गौतम गंभीर
By admin | Published: May 16, 2015 2:23 AM