नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातील शालेय स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूने पदकतालिकेत आघाडी घेतली. त्यांनी २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत ५ पदकांची कमाई केली. यात सी. प्रवीण याने १७ वर्षांखालील मुलांच्या तिहेरी उडीत मिळवलेले सुवर्णपदक उल्लेखनीय ठरले. महाराष्ट्राने दोन पदके मिळवली. ही दोन्ही पदके १५०० मीटर धावण्याच्या मुलींच्या गटातील आहेत. प्रगती मुलाने हिने रौप्य तर पल्लवी जगदाळे हिने कांस्यपदक मिळवले.
नवी दिल्ली येथील अॅथलेटिक्स स्टेडियमवर स्पर्धेला मोठ्या उत्साहाने बुधवारपासून सुरुवात झाली. उत्तर प्रदेशच्या सचिन गुज्जर आणि आकाश एम. व्हर्गिस यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकाविले. केरळ आणि उत्तर प्रदेश यांनी प्रत्येकी तीन पदके मिळवली. आठवडाभर चालणा-या या १७ वर्षांखालील स्पर्धेत एकूण १६ खेळांचा समावेश आहे. त्यात १९९ सुवर्ण, १९९ रौप्य आणि २७५ कांस्यपदकांचा समावेश आहे. तळागाळातील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य शोधून काढण्यासाठी खेलो इंडिया या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या मुलींची चमक पहिल्या दिवशी महाराष्ट्रने दोन पदकांची कमाई करीत चमक दाखवली. हे दोन्ही पदके १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळाली आहेत. नाशिक येथील भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या प्रगती मुलाने हिने ४:५२:५१ मिनिटांचा वेळ देत रौप्यपदक पटकाविले. तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. पंढरपूर-सोलापूर येथील भैरवनाथ विद्यालयाच्या पल्लवी जगदाळे हिने ४:५९:०२ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवून दिले.