कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे दोन सत्रांपेक्षा अधिक वेळ वाया गेला. निराशाजनक सुरुवातीनंतर भारताने पहिल्या डावात २ बाद ५० धावांची मजल मारली होती. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. संततधार पावसामुळे आज केवळ एक तासाचा खेळ शक्य झाला. भारताने १५ षटके फलंदाजी केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. उपाहारानंतर खेळ शक्य झाला नाही. त्यावेळी चेतेश्वर पुजारा (१९) आणि विराट कोहली (१४) खेळपट्टीवर होते. मैदानाची दोनदा पाहणी करण्यात आल्यानंतर पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आगामी चार दिवस वातावरण योग्य असेल तर खेळ सकाळी ९.४५ वाजता सुरू होणार असून ५.१५ वाजेपर्यंत राहील. त्याआधी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेला सुरुवातीलाच यश मिळवून दिले. लोकेश राहुल दुसऱ्याच चेंडूवर धम्मिका प्रसादचा बळी ठरला. राहुलने पुजाराच्या साथीने डावाची सुरुवात केली. गेल्या सहा कसोटी सामन्यात सलामीला ही पाचवी जोडी आहे. रहाणेने (८) चांगली सुरुवात केली, पण चौथ्या षटकात नुवान प्रदीपने त्याला पायचित केले. दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारे भारताचे दोन्ही फलंदाज तंबूत परतले त्यावेळी धावफलकावर केवळ १४ धावांची नोंद होती. कोहली आठव्या षटकात सुदैवी ठरला. प्रदीपच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल परेराला टिपण्यात अपयश आले. प्रसादला कमरेच्या दुखापतीने मैदान सोडावे लागले. काही षटके मॅथ्यूजने गोलंदाजी केली तर हेराथने आज एक षटक टाकले. पावसामुळे निर्धारित वेळेपूर्वीच उपाहारासाठी ब्रेक घेण्यात आला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. दुखापतग्रस्त मुरली विजयच्या स्थानी चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आली तर रिद्धिमान साहाच्या स्थानी खेळत असेलल्या नमन ओझाला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव :- लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १९, अजिंक्य रहाणे पायचित गो. प्रदीप ०८, विराट कोहली खेळत आहे १४. अवांतर (७). एकूण १५ षटकांत २ बाद ५०. बाद क्रम : १-२, २-१४. गोलंदाजी : प्रसाद ४-०-१६-१, प्रदीप ६-०-१६-१, मॅथ्यूज ४-२-७-०, हेरात १-०-६-०.
पहिला दिवस पाण्यात
By admin | Published: August 29, 2015 1:12 AM