Dipa Karmakar Retirement: भारतातील क्रिडाप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आली आहे. स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाने दमदार कामगिरी केली होती, मात्र तिचे पदक थोडक्यात हुकल्याने ती चौथ्या स्थानावर राहिली होती. त्यामुळे तिला पदक जिंकता आले नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी दीपा भारतातील पहिली महिला जिम्नॅस्ट ठरली होती. रिओ ऑलिम्पिकच्या व्हॉल्ट स्पर्धेत दीपा केवळ ०.१५ गुणांनी मागे राहिल्याने कांस्यपदक जिंकू शकली नव्हती. मात्र तिच्या चमकदार कामगिरीसाठी दीपाला २०१६ मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. तसेच पुढच्याच वर्षी म्हणजे २०१७ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
२०१८ मध्ये पटकावले सुवर्णपदक; 'गोल्डन गर्ल' म्हणून ओळख
२०१८ मध्ये दीपा कर्माकरने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. ३१ वर्षीय दीपा कर्माकर हिला 'गोल्डन गर्ल' म्हणूनही ओळखले जाते. त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतीय जिम्नॅस्टिक्समधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. तिने LEAP जिम्नॅस्टिक्स सुविधेला भेट दिली आणि तरुणांना तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा दिली.
सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा
दीपाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दीपाच्या भावना तिने दीर्घ पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, 'खूप विचार केल्यानंतर मी जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेत असल्याचे ठरवले आहे. हा निर्णय सोपा नव्हता. पण आता योग्य वेळ आली आहे. जिम्नॅस्टिक हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग आहे. मला आठवते ती ५ वर्षांची दीपा, ज्या मुलीला सांगितले होते की ती सपाट पायांमुळे कधीच जिम्नॅस्ट बनू शकत नाही. पण आज मला माझेच यश पाहून खूप अभिमान वाटतो.
दीपाने निवृत्ती घेण्याचे कारण सांगितले
दीपाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ताश्कंदमधील माझा शेवटचा विजय हा एक टर्निंग पॉइंट होता. तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी कष्ट देऊ शकेन. परंतु कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मन अजूनही मानत नसले तरीही मी निवृत्ती घेत आहे.