राउरकेला : पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ला आजपासून सुरूवात होत आहे. यजमान भारतीय संघाचा सलामीचा सामना स्पेनशी होणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. खरं तर भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, मेन इन ब्ल्यूने या स्पर्धेत मागील 48 वर्षांपासून एकही किताब जिंकला नाही. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून किताब जिंकण्याची अपेक्षा आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
मागील वेळी उपांत्यपूर्व फेरीत झाला होता पराभव ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकलेल्या भारतीय संघाने 1975 मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघाला उपांत्यफेरी देखील गाठता आली नाही. याआधी 1971 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्य आणि 1973 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. यानंतर 1978 ते 2014 पर्यंत भारताला ग्रुप स्टेजच्या पुढे जाता आले नाही. मागील वेळी देखील भुवनेश्वर येथे झालेल्या विश्वचषकात भारत उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून पराभूत होऊन बाहेर पडला होता.
पहिल्या दिवशी होणार 4 सामनेस्पर्धेतील पहिला सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. दुसरीकडे दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पूल-अ च्या फ्रान्सशी भिडणार आहे. त्यानंतरचा सामना 21000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियमवर इंग्लंड आणि वेल्स यांच्यात होईल. नंतर दिवसातील शेवटचा सामना भारत आणि स्पेन यांच्यात होईल. कलिंगा स्टेडियमवर या स्पर्धेतील 24 सामने आणि बिरसा मुंडा स्टेडियमवर 20 सामने खेळवले जाणार आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
- गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश
- बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप
- मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग
- फॉरवर्ड्स - मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग
- पर्यायी खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"