ऑनलाइन लोकमतपल्लेकेल, दि. २९ :श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध दडपणाखाली दिसत असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाने २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज, शुक्रवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात तीन विकेट झटपट गमावल्या. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंका संघाने चौथ्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले आहे. चौथ्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला त्यावेळी आॅस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ३ बाद ८३ अशी अवस्था होती. त्यावेळी कर्णधार स्टिव्ह स्मिथ २६ धावा काढून खेळपट्टीवर होता.जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी १८५ धावांची गरज असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. आॅस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्याच षटकात रंगाना हेराथने उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला (१) क्लीनबोल्ड करीत श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले.
उस्मान ख्वाजाने तीन चौकार लगावले, पण आॅफ स्पिनर दिलरुवान परेराच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका खेळण्याच्या नाबाद विकेट गमावली. त्यावेळी आॅस्ट्रेलियाची २ बाद ३३ अशी अवस्था होती. त्यानंतर एस. लक्षणने सलामीवीर जो बर्न्स (२९) याला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर धावसंख्येत एका धावेची भर पडली असता पहिल्या डावात सर्वाधिक धावा फटकावणार अॅडमव्होजेसला (०) परेराने पायचित केले, पण रिव्हूमध्ये निर्णय फलंदाजाच्या बाजूने गेला.
चेंडू वळत असल्यामुळे स्मिथ व व्होजेस यांना फटके खेळण्यासाठी अडचण भासत होती. त्यामुळे धावगती संथ होती. स्मिथने ५४ चेंडूंना सामोरे जाताना एकही चौकार ठोकलेला नाही तर व्होजेस २५ चेंडूंना सामोरे जात ९ धावा काढून नाबाद आहे.त्याआधी, श्रीलंकेतर्फे दुसऱ्या डावात कुशाल मेंडिसने शानदार शतकी खेळी केली. मेंडिसचा अपवाद वगळता उभय संघातील एकाही खेळाडूला अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. सकळी वैयक्तिक १६९ धावसंख्येवरून पुढे खेळताना मेंडिसला आज केवळ ७ धावांची भर घालता आली. मिशेल स्टार्कने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. स्टार्कने ८४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. हेराथ व नुवान प्रदीप यांनी अखेरच्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३५३ धावांची मजल मारली.