ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेनं वेस्ट इंडिज दौऱ्यात खोऱ्यानं धावा केल्या. वेस्ट इंडिजबरोबरच्या पाच सामन्याच्या मालिकेत रहाणेनं तुफानी फलंदाजी करताना एका शतकासह तीन अर्धशतकं ठोकताना 336 धावा जमवल्या. आपल्या आंतराष्ट्रीय करियरमध्ये रहाणेला पहिल्यांच मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेनं 2011मध्ये वनडे तर 2013 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. सात वर्षात रहाणेला प्रथमच मालिकावीराच्या पुरस्कारावर कब्जा करण्यात यश मिळाले आहे. रहाणेला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम 11मध्ये संधी मिळाली नव्हती पण वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं आहे. शेवटच्या आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. 36.5 षटकांतच हे लक्ष्य गाठून टीम इंडियाने सहज विजय मिळवला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने षटकार खेचून भारताला शानदार विजय मिळवून दिला. पाच सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 3-1 ने विजय मिळवला आहे. यासोबतच वेस्ट इंडीजमध्ये सलग तीन वनडे सीरीज जिंकण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. रहाणेनं 78 वनडे सामन्यात 35 च्या सरासरीनं 2573 धावा केल्या आहेत. तर 46 कसोटीमध्ये 46 च्या सरासरीनं त्याने 2580 धावा ठोकल्या आहेत.
आणखी वाचा -