बेंगळुरु : उझबेकिस्तानविरुद्ध डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी संघाचे संयोजन तयार करण्याआठी अनुभवी लिएंडर पेसचे फिटनेस लक्षात घेतले जाईल. मी पहिल्यांदा लिएंडरला सरावात व्यस्त पाहिले. पुढील दोन दिवस आणखी खेळ न्याहाळल्यानंतर त्याच्या खेळण्याबाबत निर्णय होईल, असे भारताचा गैर खेळाडू कर्णधार महेश भूपती याने बुधवारी सांगितले.पत्रकारांशी बोलताना भूपती म्हणाला, ‘सरावाच्यावेळी पेस चांगल्या लयीत जाणवला. तो दोन दिवस आणखी काही सेट खेळल्यानंतर बघू या. मेक्सिकोत अशीच परिस्थिती होती. तेथे पेसने चॅलेंजर ट्रॉफी जिंकली. येथे त्याला अशीच मदत मिळण्याची अपेक्षा आहे.’ भारताचा यूकी भांबरी आणि उझबेकिस्तानचा डेनिस इस्तोमिन यांच्या अनुपस्थितीमुळे लढत तुल्यबळ झाल्याचे भूपतीला वाटते. तो पुढे म्हणाला,‘ इस्तोमिन येणार नाही, असे ऐकले होते. यूकीची अनुपस्थिती आमच्यासाठी धक्का आहे. पण दोघांच्या अनुपस्थितीने लढत बरोबरीची झाली. या दोघांच्या न खेळण्याने चुरस कमी झाली का, असा सवाल करताच ७ तारखेला सामने सुरू झाल्यानंतर याचे उत्तर मिळेल. भारतीय संघ बेंगळुरुत खेळत आहे, इतकेच मी जाणतो. यूकीची अनुपस्थिती ही अन्य खेळाडूंना कर्तृत्व दाखविण्याची मोठी संधी ठरावी. ’ नव्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास व यूकी तसेच साकेत मिनेनी तंदुरुस्त होऊन कोेर्टवर परतल्यास संघ निवडीत आणखी चुरस पहायला मिळणार आहे.’ (वृत्तसंस्था)>सरावासाठी पेस कोर्टवर!भारताच्या दुहेरी जोडीबाबत अजूनही साशंकता आहे. असे असले तरी स्टार टेनिसपटू लिएंडर पेस याने मात्र आपल्या सरावाला सुरुवात केली. उजबेकिस्तान विरुध्द शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या डेविस चषकासाठी पेसने बुधवारी घाम गाळला. ४३ वर्षीय पेसने केएसएलटीए हार्डकोर्टवर सर्व्हिस, बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्ड शॉट्सचा अभ्यास केला. या वेळी ज्युनिअर खेळाडू आणि प्रशिक्षक जिशान अलीसुद्धा होते. पेस हा डेविस चषकासाठी रिझर्व्ह संघात आहे. दुसरीकडे, महेश भूपती याने डेविस चषकाबाबत आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्याने रोहन बोपन्ना आणि पेस यांना रिझर्व्ह खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. जोडीबाबत खुलासा करणे त्याने टाळले.
आधी लिएंडरची तंदुरुस्ती पाहणार
By admin | Published: April 06, 2017 4:17 AM