नवी दिल्ली : ‘‘विजेतेपदाबद्दल खेळाडूंना सध्या लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार मिळतात. पण एक वेळ अशीही होती, की पहिली कुस्ती जिंकली तेव्हा चार आणे (२५ पैसे) हातावर पडले होते.’’ सर्वश्रेष्ठ कुस्तीगुरू महाबली सतपाल यांनी स्वत:च्या ६१व्या वाढदिवशी हे रहस्योद्घाटन खेळाडूंपुढे केले. एका स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर खेळाडूंना यशाची पायरी सर करण्यासाठी कठोर मेहनतीवाचून पर्याय नसल्याचे सांगितले.आॅलिम्पिकपदक विजेते सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांचे ‘गुरू’ पद्मश्री सतपाल यांनी स्वत:च्या कारकिर्दीला उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘मी आयुष्यात तीन हजार कुस्त्या जिंकल्या. दिवसभरात २१ कुस्त्या जिंकण्याचा विश्वविक्रमही माझ्याच नावावर आहे. पहिली कुस्ती जिंकल्याचे माझे बक्षीस चार आणे होते. मी एका वेळी चार कुस्त्या जिंकल्याने चार वेळा चार आणे कमविले होते. पण काळ बदलत गेला. अखेरची कुस्ती खेळण्याआधीच माझ्या खात्यात सहा लाख जमा करण्यात आले होते.’’सतपाल यांनी मुलांना कठोर मेहनत करण्याचे आवाहन करीत स्वत:ची दिनचर्या सांगितली. लक्ष्य नेहमी मोठे ठेवा म्हणजे यश मिळते. मी पराभव मान्य करत नाही. शिष्यांनादेखील कठोर मेहनत करण्याचा सल्ला देतो. सुशीलला नेहमी हेच सांगितल्याने तो आपल्यापुढे यशस्वी मल्ल होऊन उभा असल्याचे सतपाल यांनी सांगितले. दरम्यान, त्यांचे शिष्य सुशील, योगेश्वर, अमित, बजरंग यांनी महाबलींचा वाढदिवस छत्रसाल आखाड्यात साजरा केला. आगामी रियो आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यास कटिबद्ध राहू, असा दोघांनीही गुरूंना शब्द दिला. (वृत्तसंस्था)मी रोज आठ तास सराव करायचो. आठ हजार बैठका आणि त्यानंतर आठ हजार दंड. त्याशिवाय १५ किमी दौड लावत होतो. पहिल्यांदा आॅलिम्पिकमध्ये उतरलो तेव्हा वय होते अवघे १६ वर्षे! अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हा १७ वर्षांचा होतो. याच वर्षी मी ‘भारतकेसरी’ आणि ‘रुस्तम-ए- हिंद’ बनलो. कुठल्याही यशात गुरू आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा असतो. गुरूची शक्ती नसेल तर काही खरे नाही. गुरू हनुमानसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात गुरुस्थानी आली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानतो. मी गुरूचा मार खात होतो कारण त्यांना माझ्याकडून अपेक्षा होत्या. मार खाल्ल्यामुळेच अन्य मल्ल जे सहा महिन्यांत शिकायचे ते मी एका महिन्यात शिकलो. - महाबली सतपाल
पहिल्या कुस्तीचे मिळाले होते ‘चार आणे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2015 10:29 PM