मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ४ हजार जणांना प्राथमिक उपचार घ्यावे लागले, तर १४ जणांना जास्त त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ५ जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले ५३ वर्षीय किरीट गणात्रा धावत असताना पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्यांना तत्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासगी कंपनीचे चॅम्पियन्स म्हणून मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आशिष मालकर हे अंतिम रेषेच्या जवळ आल्यावर पडले. त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांनाही बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. रमेशसिंग चौधरी यांचा डावा गुडघा फ्रॅक्चर झाल्याने त्यांनाही बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अविक चॅटर्जी यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूनमसिंग यांच्या घोट्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. विजय डिसिल्व्हा यांनी दिली.मॅरेथॉनमध्ये अनेकांना पायात चमक भरणे, गोळा येणे, डिहायड्रेशन असा त्रास जाणवला. ३० जणांना जास्त डिहायड्रेशनचा त्रास जाणवल्याने त्यांच्यावर रिहायड्रेशन थेरपी करावी लागली. ३ जणांना थेरपीसाठी दाखल करण्यात आले होते. पण नंतर लगेच त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. डिसिल्व्हा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले ५ जण रुग्णालयात
By admin | Published: January 19, 2015 3:49 AM