कराची : मागच्या आठवड्यात दुबईत पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) दुसऱ्या पर्वात झालेले फिक्सिंग आणि भ्रष्टाचारप्रकरणी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान याच्यावर संशयाची सुई डोकावत आहे.पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी लाहोरमध्ये पत्रकारांना ही माहिती देताना सांगितले की, शार्जील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध पुरावे गवसताच त्यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात आली. दोघांची पाकला तडकाफडकी रवानगी करण्यात आली होती. इरफानविरुद्धचा तपास अद्यापही शिल्लक आहे. शर्जील, खालिद आणि इरफान हे तिघे पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाचे खेळाडू आहेत. इस्लामाबाद संघाने प्रकरण चव्हाट्यावर येताच दुसऱ्या सामन्यात डच्चू दिला होता. पहिला सामना मात्र तो खेळला. शहरयार पुढे म्हणाले, ‘इरफानचा तपास अद्याप सुरू आहे. दोन-तीन दिवसांत त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. पाककडून खेळलेला जुल्फिकार बाबर आणि शहजेब हसन हे निर्दोष आढळल्याने ते पीएसएलमध्ये खेळू शकतात. शर्जील आणि खालिद यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आधीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.’ (वृत्तसंस्था)...तोपर्यंत भ्रष्टाचार संपणार नाही : आफ्रिदीच्पाकिस्तान क्रिकेटला लागलेली भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगची कीड थांबण्याची चिन्हे दिसत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या संदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. जोवर पीसीबी कठोर पावले उचलणार नाही, तोवर हे प्रकार बंद होणार नसल्याचे अष्टपैलू शाहीद आफ्रिदीचे मत आहे. आफ्रिदी म्हणाला,‘पाकिस्तान सुपर लीगमध्ये शर्जील खान आणि खालिद लतिफ यांची पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने कठोर विचारपूस केली. या स्कॅन्डलमुळे मी हैराण आहे. भ्रष्ट मार्गात गुंतलेल्यांसाठी पीसीबी जोवर कठोर शिक्षेचा पायंडा पाडत नाही, तोवर असेच चालत राहणार.तुम्ही डागाळलेल्या खेळाडूंना पुनरागमनाची संधी देत असाल तर मी काय बोलणार!’ अशाप्रकारच्या संकटांवर तोडगा शोधण्याचे मार्ग खुले असले तरी बोर्डाची मिळमिळीत भूमिका मारक ठरत आहे. डागाळलेले खेळाडू पाच वर्षानंतर संघात परतल्यामुळे चुकीचा संदेश गेला आहे. कठोर पावले उचलल्याशिवाय धोका संपणार नाही.पीसीबीनेच आता काहीतरी करावे, असे आवाहन आफ्रिदीने केले.
गोलंदाज मोहम्मद इरफानवर फिक्सिंगचा संशय
By admin | Published: February 14, 2017 12:14 AM