लुसाने - दुखापतीतून सावरल्यानंतर एक महिन्याने परतलेला ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीगच्या लुसाने येथील सत्रात शुक्रवारी दुसऱ्यांदा पोडियममध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असेल.
भारताच्या २५ वर्षीय चोप्राने ५ मे रोजी डायमंड लीगच्या दोहा सत्रात शानदार सुरुवात करून कारकिर्दीतील सर्वोत्तम ८८.६७ मीटर भालाफेक केली होती. मात्र, त्यानंतर त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने ताे जखमी झाला. नेदरलँड येथे चार जूनला होणाऱ्या एफबीके स्पर्धा आणि १३ जूनला फिनलँडमधील पावो नुरमी स्पर्धेतून माघार घेतल्याचे त्याने २९ मे रोजी जाहीर केले.
डायमंड लीगच्या कोणत्याही सत्रातून तो बाहेर राहिला नाही. कारण, रबात, रोम, पॅरिस, ओस्लो डायमंड लीमध्ये भालाफेक स्पर्धा नव्हती. ऑलिम्पिक रौप्य विजेता चेक गणराज्यचा याकूब वालेश, जगज्जेता ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स, फिनलँडचा ऑलिव्हर हेलांडर, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा २०१२ मधील ऑलिम्पिक चॅम्पियन केशाॅर्न वाटकाॅट आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर सहभागी होणार आहेत. दोहा डायमंड लीग जिंकल्यानंतर चोप्रा अद्याप आघाडीवर आहे. त्याच्यानंतर याकूब आणि पीटर्स यांचा क्रमांक आहे. र मोनाको येथे २१ जुलैला आणि झुरिच येथे ३१ ऑगस्टला होणाऱ्या डायमंड लीगच्या सत्रातही भालाफेक स्पर्धा होणार आहे.