गॉल : डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथच्या अचूक माऱ्याच्या जोरावर यजमान श्रीलंकेने येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडले. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या दोन फलंदाजांना माघारी परतवून श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ४८४ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५१ धावांत संपुष्टात आला. हेराथने ६८ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेऊन विंडिजचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फॉलोआॅन स्वीकारून दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या विंडिजची तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ६७ अशी अवस्था झाली आहे. विंडिजला डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप १६६ धावांची गरज असून, त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा डॅरेन ब्राव्हो २० धावा काढून खेळपट्टीवर असून, दुसऱ्या टोकावर त्याला नाईट वॉचमन देवेंद्र बिशू (६) साथ देत आहे. दुसऱ्या डावात श्रीलंकेतर्फे हेराथ व मिलिंद श्रीवर्धना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. सलामीवीर शई होप (६) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, तर क्रेग ब्रेथवेट (३४) दिवसअखेर बाद झाला. विंडिजने कालच्या २ बाद ६६ धावसंख्येवरून आज खेळायला सुरुवात केली. नियमित अंतरात फलंदाज बाद होत गेल्यामुळे त्यांचा डाव अडचणीत आला. ११व्या क्रमांकाचा फलंदाज वगळता विंडिजच्या उर्वरित सर्व फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली; पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. ब्राव्होने सर्वांधिक ५० धावांची खेळी केली. त्यानंतर धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तळाच्या जेरोम टेलरचा (३१) क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)
वेस्ट इंडिजवर फॉलोआॅनची नामुष्की
By admin | Published: October 16, 2015 11:49 PM