नवी दिल्ली - बेंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रातील (साई) भोजन निकृष्ट दर्जाचे असून परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याची तक्रार भारतीय हॉकी संघाचे मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी हॉकी इंडियाकडे केली.भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची येथे तयारी करीत आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष नरिंदर बत्रा हे सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे प्रमुख आहेत. त्यांनी मुख्य कोचकडून तक्रार प्राप्त होताच क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले.हॉकी इंडियाला लिहिलेल्या पत्रात हरेंद्र म्हणाले,‘मी आपल्या नजरेस आणून देऊ इच्छितो की, बेंगळुरुच्या साई केंद्रातील भोजन खराब दर्जाचे आहे. भोजनात गरजेपेक्षा अधिक तेल व फॅटचे प्रमाण आहे. जेवणात किडे आणि केस आढळून आले. येथे स्वच्छतेचे देखील भान राखले जात नाही. किचनमध्ये जी भांडी वापरली जातात ती देखील योग्य नाहीत. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाड व विश्वचषकाची तयारी करीत आहोत. त्यासाठी खेळाडूंना पोषक तत्त्व असलेला आहार मिळायला हवा.’‘आम्ही ४८ खेळाडूंच्या रक्ताची चाचणी घेतली. काही खेळाडूंच्या रक्तात पोषक द्रव्याचा अभाव आढळून आला. असेच सुरू राहिल्यास सर्वोत्कृष्ट कामगिरी कशी घडेल,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (वृत्तसंस्था)
साई केंद्रातील भोजन निकृष्ट, स्वच्छतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:43 AM