पणजी : महाराष्ट्र संघाने लक्षद्वीप संघाचा ३-० ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी संतोष चषक स्पर्धेसाठी आयोजित पश्चिम विभागीय पात्रता फेरीतील स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. हा सामना धुळेर-म्हापसा मैदानावर खेळविण्यात आला. महाराष्ट्राकडून यश म्हात्रे (११ व्या), अॅलन डायस (५३) आणि शेनॉन परेरा (८२) यांनी गोल नोंदवला. लक्षद्वीपकडून एकही गोल नोंदवण्यात आला नाही.आजच्या सामन्यासाठी महाराष्ट्र संघाने संघात काही बदल केले होते. अद्वैत शिंदे आणि प्रग्नेश सोळंकी यांनी सुरुवात केली. अमन गायकवाडला विश्रांती देण्यात आली. दमण आणि दीव संघावर एकमेव गोलने विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र संघाने आज गोल नोंदवण्यासाठी वेळ घालवला नाही. ११ व्या मिनिटालच महाराष्ट्राने आघाडी घेतली. यशने हेडरद्वारे हा गोल नोंदवला. मध्यंतरात महाराष्ट्र एका गोलने आघाडीवर होता. दुसºया सत्रात, महाराष्ट्र संघाने ५३ व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. निखिल प्रभू याने लांबवरून चेंडू अॅलनकडे सोपविला यावर त्याने कोणतीही चूक न करता गोलसंधी साधली. त्यानंतर ८२ व्या मिनिटाला शेनॉन परेरा याने संघाचा तिसरा गोल नोंदवला. चौथा गोल नोंदवण्याची संधी प्रग्नेशला मिळाली होती, मात्र सहा यार्डवरून मारलेला त्याचा फटका हुकला. संघाच्या विजयानंतर महाराष्ट्राचे साहाय्यक प्रशिक्षक परेश शिवोलकर म्हणाले की, आम्ही खेळात बरीच सुधारणा केली आहे. आक्रमकता वाढल्याने मी समाधानी आहे. संघाला बºयाच संधी मिळाल्या, मी खेळाडूंवर खुश आहे. आजचे सामने : राजस्थान वि. दादर अॅण्ड नगर हवेली (सकाळी ८ वा.), मध्य प्रदेश वि. गोवा (दुपारी ३.३० वा.) दोन्ही सामने : धुळेर मैदानावर.
फुटबॉल : महाराष्ट्राचा लक्षद्वीपवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 8:53 PM