राजकोट : येथील माधवराव शिंदे स्टेडियमवर रविवारी रंगणाऱ्या भारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाचा झटका बसू नये, यासाठी कडेकोट सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे. कुठलीही कसर शिल्लक राहू नये, या दृष्टीने सुरक्षेचे सर्व उपाय योजण्यात आल्याने स्टेडियमला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप आले आहे.पटेलांनी आरक्षण आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा इशारा दिला असून सामन्याची एक हजार तिकिटे खरेदी केली आहेत. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी स्टेडियम परिसरातील हवाई टेहळणी करण्यात येईल. त्यासाठी तीन ड्रोन कॅमेरेदेखील लावण्यात येतील. गुजरातमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या पटेल (पाटीदार) समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी दावा केला, की पटेल समाजाचे हजार लोक एकसारख्या वेशभूषेत स्टेडियमवर हजेरी लावतील; शिवाय विशेष शैलीत घोषणा देतील. स्टेडियमच्या आत प्रवेश नाकारण्यात आल्यास आम्ही आपल्या शैलीत बाहेर क्रिकेट खेळू. २५ आॅगस्ट रोजी हार्दिकला काही वेळेसाठी अटक होताच राज्यात हिंसाचार उफाळला होता. त्यात दहा जण मृत्युमुखी पडले. पटेलसमर्थकांनी शेकडो वाहने पेटवून दिली होती. क्रिकेट सामन्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, या राजकोट क्रिकेट संघटनेचे सचिव निरंजन शाह यांनी केलेल्या आवाहनाकडेदेखील हार्दिक यांनी काना डोळा केला.दरम्यान, राजकोट ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गगनदीप गंभीर यांनी सुरक्षेची माहिती देताना सांगितले, की सामन्यासाठी दोन हजार पोलीस जवान तैनात करण्यात येत असून त्यात पाच एसपी स्तराचे अधिकारी असतील. प्रवेशाच्या प्रत्येक पॉर्इंटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हवाई टेहळणीसाठी तीन ड्रोन कॅमेरे राहतील. याशिवाय स्टेडियमच्या आत साध्या वेशातील जवान असतील.(वृत्तसंस्था) >>पुजाराने दिली टीम इंडियाला मेजवानीतिसऱ्या वन डेसाठी येथे दाखल झालेल्या टीम इंडियातील सहकाऱ्यांना कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने घरी आमंत्रित करीत शानदार मेजवानी दिली. इंदूर येथून सायंकाळी टीम इंडियाचे राजकोटला आगमन होताच टीम इंडियातील सर्व खेळाडू आणि स्टाफने रात्रीच्या मेजवानीस उपस्थिती दर्शविली. बीसीसीआयने टिष्ट्वटरवर फोटो टाकला. त्यात पुजारासोबत महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, अमित मिश्रा, रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विन आणि शिखर धवन दिसत आहेत. संपूर्ण संघाने पुजाराकडे रात्रीचे जेवण घेतल्याचे अकाऊंटवर लिहिण्यात आले आहे.
राजकोट स्टेडियमला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप
By admin | Published: October 16, 2015 11:57 PM