कानपूर : न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्कवर २२ सप्टेंबरपासून भारताच्या खेळल्या जाणाऱ्या ५०० व्या कसोटी सामन्यादरम्यान उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेतर्फे भारताच्या माजी १२ कसोटी कर्णधारांचा सत्कार करण्यात येणार आहे. माजी कर्णधारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अनेक माजी कर्णधारांबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘यूपीसीए’चे संचालक राजीव शुक्ला यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘यूपीसीएने सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी सकाळी माजी कसोटी कर्णधारांचा विशेष सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत १२ माजी कसोटी कर्णधारांनी निमंत्रणाचा स्वीकार करीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यात चंदू बोर्डे, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, के. श्रीकांत, अनिल कुंबळे, रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे. भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यालाही आमंत्रण पाठविण्यात आले आहे, पण तो सध्या अमेरिकेत त्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्या सहभागाबाबत दुजोरा मिळालेला नाही.’शुक्ला पुढे म्हणाले, ‘२१ सप्टेंबरला माजी कर्णधारांच्या सन्मानार्थ रात्री विशेष पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांनी सहमती दर्शवली आहे. उद््घाटनासाठी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक येणार असून समारोप मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे, पण अद्याप कार्यक्रम निश्चित झालेला नाही.’ (वृत्तसंस्था)।२००० शालेय विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत कसोटी सामना बघण्याची संधी देण्यासाठी यूपीसीएची तयारी सुरू आहे. या व्यतिरिक्त ५०० व्या कसोटी सामन्यानिमित्त २५ हजार विशेष टी-शर्ट तयार करण्यात आले आहेत. हे टी-शर्ट प्रेक्षकांव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ५०० किलो लाडूंचे वाटप करण्यात येणार असून ५०० फुगे हवेत सोडण्यात येतील. - राजीव शुक्ला
माजी कर्णधारांचा होणार सत्कार
By admin | Published: September 19, 2016 4:01 AM