नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. स्पर्धेत १२७ भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे. भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. सानूच्या चंदेरी यशामुळे भारतानं पहिल्याच दिवशी पदकांचं खातं उघडलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या केवळ १० खेळाडूंचा सहभाग आहे. याबद्दल क्रिकेटपटू इमरान नझीरनं तीव्र नाराजी व्यक्त केली.
ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील पाकिस्तानी खेळाडूंची संख्या पाहून इमरान नझीरनं संताप व्यक्त केला. नझीरनं त्याचा राग पाकिस्तानवरच काढला. त्यांनी ऑलिम्पिकमधील पाकिस्तानी संघाचा २०१२ आणि २०२१ चे फोटो शेअर केले. 'हे अतिशय दु:खद आहे. २२ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशातून केवळ १० खेळाडू. यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानातील प्रत्येकाला याची लाज वाटायला हवी,' असं नझीरनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधीच्या रियो ऑलिम्पिकसाठी पाकिस्तानचे ७ खेळाडू पात्र ठरले आहेत.
२०१२ मध्ये लंडनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली. त्यात पाकिस्तानच्या २१ खेळाडूंचा सहभाग होता. १९५६ मध्ये संपन्न झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ६२ खेळाडू सहभागी झाले होते. पाकिस्तानला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये १० पदकं मिळाली आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. १९९२ नंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळालेलं नाही.