मुंबई : गेल्याच आठवड्यात झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये एकहाती वर्चस्व राखून बाजी मारलेल्या पवार - म्हाडदळकर गटाची यंदाची पहिली बैठक नुकतीच झाली. याद्वारे त्यांनी मुंबई क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी ‘क्रिकेट सुधार समिती’ जाहीर केली. एमसीए उपाध्यक्ष व माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे अध्यक्ष असलेल्या या समितीमध्ये एकूण ८ व्यक्तींचा समावेश असून यापैकी ५ जण मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार आहेत हे विशेष. त्यामुळेच मुंबई क्रिकेटच्या प्रगतीसाठी माजी कर्णधार एकत्र आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची देखील मदत यामध्ये घेणार असल्याची माहिती एमसीए उपाध्यक्ष वेंगसरकर यांनी दिली.देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा राखलेल्या मुंबई क्रिकेटला पुन्हा एकदा तेच वर्चस्व मिळवून देण्यासाठी एमसीएची नवनिर्वाचित समिती सज्ज झाली असून त्याची माहिती उपाध्यक्ष वेंगसरकर यांनी गुरुवारी दिली. यावेळी त्यांनी क्रिकेट सुधार समितीची माहिती दिली. वेंगसरकर अध्यक्ष असलेल्या या समितीमध्ये अजित वाडेकर, अजित आगरकर, संजय मांजरेकर आणि संजय मांजरेकर या मुंबईच्या माजी कर्णधारांसह एमसीए व्यवस्थापकीय समिती सदस्य दीपक पाटील, माजी कसोटीपटू प्रवीण आमरे आणि माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांचा समावेश आहे. सचिनच्या सहभागाबाबत वेंगसरकर म्हणाले की, सचिनचे मार्गदर्शन युवा खेळाडूंसाठी मोलाचे ठरेल. समितीमध्ये मुंबईच्या माजी कर्णधारांचा समावेश असून सचिनच्या सहभागाने युवा खेळाडूंना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव होईल. तसेच सचिनला या समितीमध्ये विशेष निमंत्रण देऊन सहभागी केले असून तो आपल्या वेळेनुसार समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होईल, असेही वेंगसरकर यांनी सांगितले. क्रिकेट सुधारणा समितीच्या कामगिरीची माहिती देताना वेंगसरकर म्हणाले की, मुंबईच्या सर्व वयोगटातील प्रशिक्षकांसोबत चर्चा करून मुंबईच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल. त्याचप्रमाणे एमसीएशी संलग्न असलेल्या सर्व ३२९ क्लब्सना बीकेसीचे सदस्यत्व देण्यात येणार असल्याची माहिती देखील वेंगसरकर यांनी दिली.दरम्यान, गतमोसमात मुंबई वरिष्ठ संघातील खेळाडूंच्या गैरवर्तनाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. याविषयी वेंगसरकर यांनी सांगितले की, सुधार समिती लवकरच शिस्तपालन समिती स्थापन करणार असून यामध्ये कोणत्याही वयोगटातील खेळाडू असू दे, गैरवर्तन केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्यात येईल. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई क्रिकेटसाठी माजी कर्णधारांची मजबूत ‘टीम’
By admin | Published: June 26, 2015 2:05 AM