भारतीय खेळाडूनं त्याच्या पत्नी व आईची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांसमोर त्यानं तशी कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. भारताला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देणाऱ्या इक्बाल सिंग बोपाराई यांनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे. 62 वर्षीय इक्बाल सिंग हे अमेरिकेत राहतात आणि त्यांनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला.
सिंग यांनी 1983साली कुवेत येथे झालेल्या आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोळा फेक प्रकारात देशाला कांस्य पदक जिंकून दिले होते. सिंग हे पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवाशी आहेत. 80च्या दशकात ते भारताचे आघाडीचे गोळा फेकपटू होते. 1988मध्ये नवी दिल्लीत त्यांनी 18.77 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी केली होती होती. रविवारी त्यांनी स्वतः पोलिसांना फोन केला आणि गुन्हा कबुल केला.
पोलीस जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा सिंग यांचे हात रक्तानं माखले होते. त्यांच्या घरातील आतल्या खोलीत दोन महिलांचे शव पडले होते. त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, त्यांना जामीन नामंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेत ते टॅक्सी चालक होते. त्यांच्या शरिरावरही काही जखमा होत्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
त्यांची आई नसीब कौर आणि पत्नी जस्पाल कौर या जमिनीवर पडल्या होत्या. त्यांची हत्या करण्यामागचं कारण अद्याप समजलेलं नाही. ''मी दोघींची हत्या केली. तुझ्या आईला आणि आजीला मी मारलं. पोलिसांना फोन कर आणि मला अटक करायला सांग,''असे सिंग यांनी त्यांच्या मुलाला फोनवरून सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलीला फोन करूनही हेच सांगितले.
जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!