Rani Rampal Retirement : भारताच्याहॉकीला नव्या उंचीवर पोहोचवणारी राणी रामपाल. भारताच्या महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने गुरुवारी आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला पूर्णविराम देत निवृत्तीची घोषणा केली. तिने वयाच्या २९व्या वर्षी हॉकीला रामराम केले. हरयाणातील एका लहान शहरातून आलेल्या राणीने आपल्या प्रभावी कामगिरीने देशाला आपल्या खेळीची दखल घ्यायला लावली. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाला आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीकडे नेले.
राणीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले आणि भारतासाठी २५४ सामन्यांमध्ये २०५ गोल केले. तिला २०२० मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्याच वर्षी तिला पद्मश्री हा देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राणी रामपालने सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले. १५ वर्षे अभिमानाने भारताची जर्सी परिधान केल्यानंतर, माझ्यासाठी खेळाडू म्हणून यातून बाजूला होण्याची वेळ आली आहे. हॉकी हा खेळ, माझी आवड आणि माझे जीवन हा मला मिळालेला सर्वात मोठा सन्मान आहे. छोट्या सुरुवातीपासून ते मोठ्या टप्प्यांवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा हा प्रवास अप्रतिम राहिला. प्रत्येक चाहता, माझा सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षक यांची मी सदैव ऋणी राहिन, असे तिने नमूद केले.
हॉकी इंडियाने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, एका उत्कृष्टतेचे युग संपले आहे... आज राणी रामपालला या खेळातून निरोप देत आहोत. तिने एक दशकाहून अधिक काळ भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले. भारताला अगणित विजय मिळवून देण्यापासून ते देशभरातील महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनण्यापर्यंत राणीचा प्रवास अविस्मरणीय आहे.
खरे तर राणी रामपाल २०२३ च्या सुरुवातीपासूनच भारतासाठी खेळली नाही. तत्कालीन प्रशिक्षक जेनेके शॉपमन यांनी तिला वगळण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले होते. मात्र, राणीने तिला वगळण्याचे स्पष्ट कारण न दिल्याने निराशा व्यक्त केली.