- हर्षा भोगले लिहितो..वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य, खेळभावना, प्रेरकशक्ती आणि संकटांवर मात करण्याची वृत्ती असावी लागते. पराकोटीच्या संघर्षात भारताने मिळविलेला विजय शानदार ठरला. प्रेक्षकांनादेखील अशा प्रकारच्या शानदार खेळाची अपेक्षा होती.भारताने चारही दिवस विजयाच्या जिद्दीने खेळ केला. दुसरीकडे आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या डीएनएमध्येच झुंजारवृत्ती आहे. पण या सामन्यात झुंजारवृत्तीचा अभाव जाणवला. आशिया खंडात पूर्वी मॅथ्यू हेडन जसा धावा काढायचा तीच परंपरा सध्या डेव्हिड वॉर्नरने चालवायला हवी, असे आॅस्ट्रेलियाला वाटत असावे.चौथ्या दिवशी कौशल्यापेक्षा खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची गरज होती. भारतीय खेळाडूंमध्ये ती दिसली. १८७ धावा केल्यानंतरही विजय मिळविण्यासाठीच कोहली अँड कंपनीने सर्वस्व पणाला लावले. आॅस्ट्रेलिया संघाबाबत विचार केल्यास हे टार्गेट कठीण नव्हते. धावांचा पाठलाग करण्याचे डावपेचही ठरले होते. पण प्रत्यक्ष मैदानावर लढण्याची वेळ आली, तेव्हा खेळाडंूचे तंत्र चुकत गेले. त्यामुळेच चौथ्या दिवसाचा खेळ संपायच्या आतच हा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.कागदावर मालिका १-१ अशी बरोबरीत आली तरी भारत मालिकेत पुढे आहे. एखादा संघ पराभवातून धडा घेत जिंकतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित झालेला असतो. ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आॅस्ट्रेलियालाबंगळुरूमध्येच होती. पण त्यांनी ती गमविल्याने पुढील दोन सामन्यांत विजय मिळविणे सोपे जाणार नाही. बंगळुरूत भारताला झालेला सर्वांत मोठा लाभ म्हणजे आश्विनचा आत्मविश्वास परतणे. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू त्याची सतत धास्ती बाळगतील व आश्विन गोलंदाजीला येताच भारताला त्याचा सातत्याने लाभ होणार आहे.मालिकेत पुनरागमन आॅस्ट्रेलियासाठी वाटते तितके सोपे नाहीच. त्यासाठी वॉर्नरची बॅट तळपायला हवी. आशियात त्याच्या फारशा धावा नाहीत. स्मिथनेही डीआरएस वादात लक्ष न घालता फलंदाजीकडे ध्यान द्यावे. कोहलीने धावा काढल्या नसल्या तरी भारताने फलंदाजीचा दम दाखविला.रांचीत कोहलीचेही योगदान राहिले तर भारताला रोखणे आॅस्ट्रेलियासाठी एकूणच कठीण जाईल. या मालिकेचा निकाल ३-१ असा भारताच्या बाजूने राहू नये, यासाठी आता आॅस्ट्रेलियाच्या काळजीत भर पडू शकते. भारताला रोखण्यासाठी पाहुण्यांना आता चिंतन करावे लागेल.(पीएमजी)
चवताळलेला भारत मालिकेत पुढेच...
By admin | Published: March 09, 2017 4:26 AM