उदय बिनिवालेलंडन : विम्बल्डनमध्ये फ्रान्सच्या ॲड्रियन मॅनारिनोकडून आठवेळेचा विम्बल्डन विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर सलामीच्या सामन्यात सुदैवाने बचावला. जागतिक क्रमवारीत ४१ व्या स्थानावर असलेल्या मॅनारिनो याने फेडररला अक्षरश: घाम फोडला होता. सुरुवातीच्या तीन सेटनंतर २-१ ने आघाडीवर असलेला हा खेळाडू कोर्टवर घसरला. त्यामुळे त्याने लय गमावली. चार सेटनंतर त्याला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागताच फेटररने सुटकेचा श्वास सोडला.
सामन्यानंतर फेडरर म्हणाला, ‘मॅनारिनो उत्कृष्ट खेळत होता. मला कोणत्याही परिस्थितीत पहिल्या फेरीतच बाद व्हायचे नव्हते आणि मी सर्व अनुभव पणाला लावला.’ निवृत्तीबाबत कोणताही विचार नसल्याचेही त्याने नमूद केले. महिलांमध्ये अव्वल मानांकित ऐश बार्टी हिने स्पेनच्या कार्ला नव्हारोचा ६-१, ६-७, ६-१ असा पराभव केला. ती म्हणाली, ‘कार्लाचे जबरदस्त आव्हान होते. पण मी उत्कृष्ट सर्व्हिस केल्या आणि माझे नियंत्रण निर्णायक ठरले.’ पुरुष गटात रशियाच्या डेनील मेदवेदेवने जर्मनीच्या जेन लेनार्ड स्ट्रुफला ६-४, ६-१, ४-६ , ७-६ असे हरविले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने तिसरी फेरी गाठताना द. आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ६-३, ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला.