नवी दिल्ली : दुबई येथे सुरू असलेल्या आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चार बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यंदा पहिल्यांदाच एकाच वेळी युवा आणि ज्युनिअर गटाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे एकूण सात बॉक्सर्स उपांत्यपूर्व फेरीसाठी रिंगमध्ये उतरले. त्यांपैकी चार खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जयदीप रावतने ७१ किलो गटात जबरदस्त वर्चस्व राखताना संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद आइसा याला दुसऱ्याच फेरीत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. वंशज यानेही ६३.५ किलो गटात एकतर्फी बाजी मारताना ताजिकिस्तानच्या मखकमोव डोवूड याचा ५-० असा धुव्वा उडवला.
दक्ष सिंग याने किरगीस्तानच्या एल्डर तुर्दुबाएव याचा ४-१ असा पराभव करीत विजयी आगेकूच केली. अन्य लढतीत सुरेश विश्वनाथ याने ४८ किलो गटातून उपांत्य फेरी गाठताना किरगीस्तानच्या अमानतुर झोलबोरोसव याचे आव्हान ५-० असे परतावले. दुसरीकडे, व्हिक्टर सैखोम सिंग (५४ किलो), विजय सिंग (५७ किलो) आणि रवींद्र सिंग यांना आपापल्या लढतींत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.