जकार्ता : खेळाडूसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक सामन्यागणिक त्याची प्रगती किंवा अधोगती होत असते. पण एखादा खेळाडू जर चार वर्षे अपराजित राहत असेल तर, तुम्ही म्हणाला ही अफवा आहे किंवा या बातमीत काही तथ्य नाही. पण असं घडलंय आणि तेदेखील आपल्या भारतात. पण चार वर्षे अपराजित राहिल्यावर एका लढतीने त्याचा घात केला आणि त्याची विजयी घोडदौड कायम राहू शकली नाही.
साल २०१४. यावेळी इटलीच्या सासारी येथे फ्रान्सच्या लुका लॅम्पिसने त्याला पराभूत केले होते. पण त्यानंतर चार वर्षे त्याला एकही सामना गमवावा लागला नव्हता. गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यामुळेच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धांमध्ये त्याला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण या पराभवामुळे त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आले.
सध्याच्या घडीला जॉर्जियामध्ये तबिलिसी ग्रां. प्री. कुस्ती स्पर्धा सुरु आहे. या कुस्ती स्पर्धेच्या ७४ किलो वजनी गटामध्ये भारताच्या सुशील कुमारला पराभवाचा सामना करावा लागला. सुशील कुमारला यावेळी पोलंडच्या आंद्रजेज पियोत्र सोलास्कीने पराभूत केले आणि त्याची विजयी घोडदौड थांबली.