ग्रोस इसलेट : ‘‘तिसरा कसोटी सामना जिंकून खूप आनंदी आहे. कारण या सामन्यातील एक दिवस पावसामुळे वाया गेला होता. आता १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.‘‘पावसामुळे तिसरा दिवस वाया गेल्यानंतर पाचवा दिवस खेळणे खूप कठीण होते. येथे आम्ही अपेक्षित खेळ करण्यात अपयशी ठरलो. येथेही आम्ही दोन दिवस चांगला खेळ केला. त्यानंतर तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. पण, चौथ्या दिवशी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली,’’ असे कोहलीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘भुवनेश्वरची कामगिरी शानदार होती. २४ षटकात २८ धावा देऊन ५ बळी घेणे जबरदस्त कामगिरी होती. यामुळे सामन्याचे चित्र पालटले. त्याचवेळी पहिल्या डावात अश्विन व साहा यांची शतके विसरता येणार नाही. त्यांनी निर्णायक कामगिरी केली.’’‘‘ठरवलेल्या रणनितीनुसार खेळ करुन आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो. आता त्रिनिदादमध्ये होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने मैदानात उतरु. शिवाय कोणत्या बाजूंवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे याची आम्हाला जाणीव आहे,’’ असेही कोहलीने यावेळी सांगितले. (वृतसंस्था)>आॅलिम्पियन्सचे समर्थनटीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व करीत असलेल्या भारतीय खेळाडूंचे समर्थन करताना इतर देशांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंना उच्च दर्जांच्या सुविधा मिळत नसतानाही देशाचे खेळाडू जीव तोडून खेळत असल्याचे सांगितले. कोहली म्हणाला की, ‘‘खेळाडूंवर कठोर शब्दांत टीका केली जाऊ नये.’’ कोहली म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकसाठी खेळाडू कशाप्रकारे तयारी करीत असतात हे आपण पाहिले आहे. ते जीव तोडून यासाठी सज्ज होत असतात आणि जेव्हा काही लोक या बाजूकडे दुर्लक्ष करुन सरळ टीका करतात तेव्हा माझ्यामते ही अत्यंत दु:खद बाब आहे. क्रिकेटमध्येही तुम्ही प्रत्येक सामना किंवा मालिका जिंकू शकत नाही.’’>जमैका येथे झालेल्या कसोटी सामन्यात आम्ही कोणत्या चुका केल्या, याची जाणीव आम्हाला होती. तिसऱ्या सामन्यात त्याच चुका आम्ही सुधारल्या. चौथ्या दिवशी आम्ही ३१ धावांत ७ बळी घेतले. हीच कामगिरी सामना जिंकण्यास निर्णायक ठरली. आम्हाला परदेशामध्ये अधिकाधिक सामने जिंकायचे असून त्याकडे आमची वाटचाल सुरु झाली आहे.- विराट कोहली
चौथ्या कसोटीत सकारात्मकतेने खेळू
By admin | Published: August 15, 2016 4:16 AM