ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ४ - युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सेंट डेनिस येथे रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने आइसलँडचा ५-२ असा पराभव केला. सामन्याच्या प्रारंभापासूनच फ्रान्सच्या खेळाडूंनी परस्परातील समन्वय व नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात १२ व्या मिनिटाला फ्रान्सच्या ऑलीव्हर गिरोडने पहिला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर फ्रान्सच्या संघाने अधिक आक्रमक खेळ केला. २० व्या मिनिटाला अँन्टोनी ग्रिझमनने उंचावरुन दिलेल्या पासवर पोग्बाने हेडरद्वारे गोल नोंदवून संघाची आघाडी २-० अशी वाढविली. ४३ व्या मिनिटाला पेयट व ग्रिझमनने चांगली चाल रचली. पेयटने पेनाल्टी एरियातून गोलरक्षकाला चकवून अचूक चेंडू जाळ्य़ात ढकलला. यानंतर अवघ्या दोन मिनिटात याच जोडीने पुन्हा एकदा हल्ला चढवला. ४५ व्या मिनिटात ग्रिझमनने चवथ्या गोलची नोंद केली व मध्यंतरापर्यंत फ्रान्सला ४-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. सामन्या च्या ५६ व्या मिनीटाला आइसलैंडच्या सिग्यूर्डसंनने गोल केला. दिमित्रीने ५९ व्या मिनीटाला फ्रान्सकडून ५ वा गोल केला. ८६ व्या मिनिटाला आ इसलँड ने दुसरा गोल करुन पीछाडी ५-२ अशी कमी केली. आजच्या विजेत्या संघाची उपांत्य फेरीची लढत जर्मनीशी होणार आहे. पोर्तुगाल व वेल्स ही लढत अगोदरच निश्चित झालेली आहे.