जर्मनीचे महान खेळाडू फुटबॉलपटू फ्रँझ बेकनबॉर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. बेकनबॉर हे १९७४ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या पश्चिम जर्मनी संघाचे कर्णधार होते आणि त्यांनी नंतर त्यांना व्यवस्थापक म्हणून पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून दिले. खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या अवघ्या तीन पुरुषांपैकी ते एक आहे. १९७२ मध्ये त्यांनी पश्चिम जर्मनीसोबत युरोपियन चॅम्पियनशिपही जिंकली.
१९६६ च्या वर्ल्डकपमध्ये जर्मनी उपविजेता होता. तर १९७० च्या वर्ल्ड कपमध्ये तिसरा होता. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये बेकनबॉरचा जर्मनी संघात समावेश होता. याबरोबर १९८६ च्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनी उपविजेता राहिला आहे. यावेळीही संघाचे प्रशिक्षक बेकनबॉर होते.
बेकनबॉर यांनी खेळाडू म्हणून जागतिक फुटबॉलमध्ये पश्चिम जर्मनी, तसेच बायर्न म्युनिकचा दबदबा निर्माण केला होता. ते जर्मनीच्या मधल्या फळीचा भक्कम आधारस्तंभ होते. त्यांनी ‘सेंट्रल डिफेन्सिव्ह स्वीपर’ ही संकल्पना यशस्वीपणे अमलात आणली. त्यांच्या या जागेवरील खेळाचा जर्मनीच्या यशात मोलाचा वाटा होता. ते पश्चिम जर्मनीकडून १०३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले.