नोवाक जोकोव्हिचनं फ्रेंच ओपन स्पर्धेत बाजी मारली. अंतिम फेरीत स्टेफानोस त्सिस्तीपासवर ६-७ ( ६-८), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला. लाल मातीचा बादशाह राफेल नदाल याला उपांत्य फेरीत पराभूत करून नोव्हाकने जेतेपदाच्या शर्यतीतील महत्त्वाचा प्रतिस्पर्धी बाद केला. (french open 2021 novak djokovic won the french open beating stefanos tsitsipas in the final)
अंतिम फेरीत त्याच्यासमोर प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची फायनल खेळणाऱ्या स्टेफानोस त्सिस्तीपास याचे आव्हान होते. ग्रीसच्या या खेळाडूने पहिल्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये बाजी मारली. त्यानंतर दुसरा सेटही घेतला. पण, १८ ग्रॅंड स्लॅम नावावर असलेल्या नोव्हाकने कमबॅक केले. प्रतिस्पर्धीची ताकद चाचपडून पाहावी, तशी त्याने पहिल्या दोन सेटमध्ये स्टेफानोसचा खेळ समजून घेतला. त्यानंतर पुढील तिन्ही सेट घेत जेतेपद नावावर केले. नोव्हाकने ६-७ ( ६-८), २-६, ६-३, ६-२, ६-४ असा विजय पक्का केला.
नोवाक जोकोविच हा ओपन एरात (Open Era) चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा दोनवेळा जिंकणारा तो जगातला पहिला खेळाडू आहे. सन २०१६ नंतर नोवाकने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. राफेल नदाल, रॉजर फेडरर याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने जोकोव्हिचसाठी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना सोपा ठरेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, युवा त्सित्सिपासने जोकोविचला शेवटपर्यंत झुंजवले. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ हा अंतिम सामना चालला. यापूर्वी जोकोविच आणि त्सित्सिपास सात वेळा आमनेसामने आले होते. त्यात पाच वेळा जोकोविचने तर त्सित्सिपासने दोन वेळा बाजी मारली होती.