French Open 2021: जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनं फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता स्पर्धेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तब्बल २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतीपदं नावावर असलेल्या रॉजर फेडररनंही फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेच्या आयोजकांनीही यास दुजोरा दिला आहे. शनिवारी रॉजर फेडरर स्पर्धेतील तिसरा सामना खेळताना फार थकलेला जाणवत होता. तसेच त्याच्या गुडघ्याच्या दुखणंही पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
रॉजर फेडरर गेल्या दीड वर्षापासून गुडघ्याच्या दुखण्याचा सामना करत आहे. याच दरम्यान त्याच्या गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया देखील झाली आहे. शनिवारी डोमिनिक कोएपफर विरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केल्यानंतर रॉजर फेडररनं स्पर्धेत पुढे खेळण्याबाबत खूप संभ्रमात असल्याचं म्हटलं होतं. पुढील महिन्यात होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेची तयारी देखील करायची असल्याचं फेडररनं म्हटलं होतं.
फेडरर वि. कोएपफर सामना साडेतीन तास रंगलाकोएपफर विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी फेडररला खूप कडवी झुंज द्यावी लागली होती. तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या सामन्यात फेडररनं ७-६ (७-५), ६-७ (३-७), ७-६ (७-४), ७०५ असा पराभव केला होता. पण या सामन्यात फेडररच्या गुडघ्यावर ताण आल्याचं पाहायला मिळालं. "मी स्पर्धेत पुढे खेळू शकेन की नाही मला माहित नाही. मला याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. दुखापतग्रस्त गुडघ्यावर आणखी ताण देणं हे धोक्याचं नाही का? हे आता आरामाची गरज असल्याचे संकेत नाहीत का?", असं फेडरर सामना संपल्यानंतर म्हणाला होता.