पॅरिस : भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडी आपली शानदार कामगिरी कायम राखत फ्रेंच ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने जपानच्या हिरोयुकी एंडो व युता वाटाम्बे या जोडीचा पराभव केला.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद विजेत्या सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने अटीतटीच्या सामन्यात एंडो व वाटाम्बे या जोडीला २१-११, २५-२३ असे पराभूत केले. जपानच्या या जोडीकडून भारतीय जोडीला यापुर्वीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
जागतिक विजेती व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, तसेच आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांच्या पराभवानंतर सात्विक व चिराग यांच्या रुपात या स्पर्धेत भारताचे एकमेव आव्हान टिकले आहे. अंतिम सामन्यात भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या मार्कस गायडोन व केविन सुकामुजो यांच्याशी दोन हात करावे लागेल. दरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय बॅडमिंटन संघटनेने या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी एका जेतेपदाची उत्सुकतायाआधी सात्विक आणि चिराग यांनी ऑगस्ट महिन्यात सर्व भारतीयांना विजयी भेट देताना थायलंड ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात विजेतेपद उंचावले होते. यावेळी मात्र दोघांनी ऐतिहासिक कामगिरी केली. वर्ल्ड टूर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारे सात्विक-चिराग पहिली भारतीय जोडी ठरली.