ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 7 - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आज जबरदस्त उलथापालथीची नोंद झाली. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम याने यंदाच्या स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद करताना गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हाण संपुष्टात आणले. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत थिमच्या खेळासमोर जोकोव्हिचची मात्रा चालली नाही आणि अखेर या लढतीत थिमने 7-6(7-5), 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत डॉमिनिकची गाठ क्ले कोर्टचा बादशहा राफाएल नदाल याच्याशी होणार आहे.
एकतर्फी झालेल्या या लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने सुरुवातीपासूनच जोकोव्हिचवर वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूममध्ये थोडी चुरस पाहायला मिळाली. पण टायब्रेकरपर्यंत गेलेल्या या सेटमध्ये 7-6(7-5) अशी बाजी मारत डॉमिनिकने लढतीत आघाडी मिळवली.
त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ अधिक उंचावत डॉमिनिकने हा सेट 6-3 ने जिंकला. पहिले दोन सेट गमावल्यावर पुरत्या दमलेल्या जोकोव्हिचला डॉमिनिकने तिसऱ्या सेटमध्ये अजिबात वरचढ होऊ दिले नाही. अखेर या सेटमध्ये जोकोव्हिचचा 6-0 ने धुव्वा उडवत डॉमिनिकने सामना 7-6(7-5), 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये जिंकला.