पॅरीस : गतवर्षीचा उपविजेता ब्रिटनचा अँडी मरे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पोहचला आहे. आज येथे झालेल्या सामन्यात मरेने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझानवर ६-७ (३-७), ६-२, ६-२, ७-६ (७-३) असा विजय मिळवला. दुसरीकडे पाच वर्षांनंतर पॅरीसमध्ये खेळणारा जुआन मार्टिन डेल पेट्रो याला निकोलस अलमार्गो याच्या दुखापतीनंतर शेवटच्या ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले. तिसऱ्या फेरीत अँडी मरे आणि डेल पेट्रो यांच्यात शनिवारी होणारी लढत रोमहर्षक असेल असा अंदाज आत्तापासुनच व्यकत होत आहे.पन्नासावे मानांकित क्लिझानने ५७ विनर्स लगावले परंतु अग्रमानांकित मरे याने आपला अनुभव पणाला लावत क्लिझानचे प्रयत्न व्यर्थ ठरवले. स्पेनचा ३१ वर्षीय टेनिसपटू निकोलस अरमार्गो याला डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेतली, त्यामुळे डेल पेट्रो याला तिसऱ्या फेरीत स्थान मिळाले. सामन्यातील तिसरा सेट त्यावेळी सुरु होता. तत्पूर्वीच्या दोन सेटमध्ये १-१ अशी बरोबरी होती. दुखापत असह्य झालेला अरमार्गो मैदानात कोसळला तेव्हा डेल पेट्रोने त्याच्याकडे धाव घेतली. त्याला पाणी देवून धीर दिला. पेट्रोच्या या खिलाडूवृत्तीने प्रेक्षक भारावून गेले.अन्य एका सामन्यात तृतीय मानांकित स्टॅनिलास वॉवरिंकाने युक्रेनच्या अॅलेक्झांडर डोलगोपोलोव याला हरवून तिसरी फेरी गाठली. वॉवरिंकाने या सामन्यात ६-४, ७-६ (७/५), ७-५ असा विजय मिळवला. जपानच्या केई निशिकोरी यानेही अंतिम ३२ खेळाडूंत स्थान मिळवले.महिला गटात चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या एग्वाईन बुचार्डचा संघर्ष लॅटिव्हियाच्या अॅना सेवास्टोवा हिने ६-३, ६-0 असा संपुष्टात आणला. (वृत्तसंस्था)बोपन्ना-डाब्रोवस्की दुसऱ्या फेरीतभारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रीयला डाब्रोवस्की या जोडीने मिश्र दुहेरीत दुसरी फेरी गाठली. या जोडीने आॅस्ट्रेलियाच्या जेसिका मुरे आणि मॅट रिड यांना पहिल्या फेरीच्या सामन्यात ६-0, ६-१ असे सहज हरवले. त्यांचा पुढील सामना आता न्यूझीलंडच्या अर्टेम सिताक आणि युक्रेनच्या एलिना स्वितोलिना यांच्याशी होईल.हा सामना चुरशीचा होईल अशी मला अपेक्षा होती. क्लिझानने त्याचा नैसर्गिक खेळ केला. त्याचा फोरहँड जबरदस्त असून तो मैदानात कोठेही विनर्स मारु शकतो. जुआन मार्टिन हा अपेक्षेहून चांगला खेळ करीत आहे. त्याच्याकडून मला कठीण आव्हान मिळेल असे समजण्यास हरकत नाही.-अँडी मरे
फ्रेंच ओपन : मरे तिसऱ्या फेरीत
By admin | Published: June 02, 2017 12:54 AM