पॅरिस : आपल्याला ‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे का म्हटले जाते हे सिद्ध करताना स्पेनच्या राफेल नदालने आपला कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा धुव्वा उडवला. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात नदालने ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवत विक्रमी १२व्यांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे नदालने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठल्यानंतर एकदाही जेतेपद निसटू दिलेले नाही. त्याने या स्पर्धेत तब्बल ११ वेळा जेतेपद उंचावले आहे.
२०१७ साली झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच नदाल-फेडरर यांच्यात ग्रँडस्लॅम लढत झाली. यासह नदालने फेडररविरुद्धचा आपला रेकॉर्ड २४-१५ असा केला. यंदाच्या मोसमातील फेडररचा धडाका पाहता यावेळी तो नदालला लाल मातीत हरवेल अशी आशा होती. मात्र नदालने या स्पर्धेत फेडररला सलग सहाव्यांदा धूळ चारली.
सामन्यातील पहिला गुण जिंकल्यानंतर, पहिल्याच गेममध्ये ब्रेक पॉइंटची संधी निर्माण करत फेडररने झोकात सुरुवात केली. मात्र हा ब्रेक पॉइंट वाचवत नदालने पहिला गेम जिंकलाच, शिवाय पुढील गेमही जिंकून २-० अशी आघाडी मिळवली. येथेच सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. यानंतर फेडररने शानदार पुनरागमन करत ३-३ अशी बरोबरी साधली. परंतु, येथून नदालने तुफान खेळ करताना फेडररला पुनरागमनाची संधी न देता संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले.
फेडररच्या खेळामध्ये आत्मविश्वास दिसून आला नाही. त्याला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबाही मिळाला, मात्र त्याच्या खेळामध्ये जोश दिसून आला नाही. दुसरीकडे, नदालने आपल्या आवडत्या कोर्टवर सहजपणे खेळताना फेडररला सातत्याने चुक करण्यास भाग पाडले. यासह नदालने गेल्या पाच सामन्यांत फेडररविरुद्ध झालेल्या पराभवांची व्याजासहीत परतफेडही केली.
फेडररसोबत येथे खेळणे शानदार आहे. वयाच्या ३७व्या वर्षीही तो अप्रतिम खेळतोय, यासाठी फेडररचे अभिनंदन. पॅरिसमधील क्रीडा चाहत्यांचा मी आभारी आहे, कारण येथे आणखी एक अंतिम सामना खेळणे माझ्यासाठी अभिमानास्पद असेल. - राफेल नदाल