ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 12 - भारतीय नेमबाजांच्या अपयशाची कथा आॅलिम्पिकच्या सातव्या दिवशीही कायम राहिली. स्टार नेमबाज गगन नारंग आणि चैनसिंग हे शुक्रवारी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात फायनलमध्ये धडक देण्यात अपयशी ठरले. नारंग ६२३.१ गुणांसह १३ व्या आणि चैनसिंग ६१९.१९ गुणांसह ३६ व्या स्थानावर घसरला. या सामन्यात ४७ नेमबाज सहभागी होते. लंडन आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य विजेत्या नारंगला रिओमध्ये दुसऱ्यांदा अपयशाचा सामना करावा लागला. याआधी दहा मीटर एअर रायफलमध्ये गगन २३ व्या स्थानावर राहिला होता. ५० मीटरमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण येथेही त्याने निराश केले.फायनलमध्ये धडक देणाऱ्या आठपैकी अखेरच्या नेमबाजाचे गुण ६४२.८ इतके होते. अव्वल स्थानावर राहिलेला रशियाचा सर्जेई केमिन्स्की याने ६२९.० गुणांचा आॅलिम्पिक विक्रम नोंदविला. नारंगने पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने क्रमश: १०४.७, १०४.४ आणि १०४.६ असे गुण नोंदविले. चौथ्या फेरीत त्याला १०३ आणि पाचव्या फेरीत १०४ गुण मिळाले. सहाव्या आणि अखेरच्या फेरीत १०२.४ गुण मिळताच तो अंतिम फेरीतून बाद झाला. चैनसिंगची कामगिरी याहून वाईट झाली. त्याने १०४.१, १०४.४, १०२.४, १०३.९ आणि १०३.६ गुणांची कमाई केली. या प्रकारातून बाहेर झाल्यानंतर गगन व चैनसिंग हे १४आॅगस्ट रोजी ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन प्रकारात भाग घेतील.