नवी दिल्ली : ‘सध्याचे नेमबाज अत्यंत सकारात्मक विचाराने स्पर्धेत सहभागी होतात आणि आधीच त्यांचे पदक मिळवण्याचे लक्ष्य निर्धारीत झालेले असते. याआधी नेमबाजांकडून अंतिम फेरीचा विचार व्हायचे. त्यामुळेच रिओ ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरी मागे टाकून भारताच्या आत्ताचा मजबूत संघ पदक मिळवण्यास पूर्णपणे तयार आहे,’ असा विश्वास भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग याने व्यक्त केला आहे.
लंडन येथे २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या नारंगने यावेळी नेमबाजांना नशीबाचीही साथ महत्त्वाची असल्याचे सांगतानाच नेमबाजांची एकग्रता टिकून राहिले पाहिजे, असेही सांगितले. नारंगने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, ‘आमच्यावेळी आम्ही सुरुवातीच्या दिवसांमध्ये अंतिम फेरी गाठण्याचा विचार करायचो, त्यानंतर पुढील लढतीवर लक्ष केंद्रीत करायचो. आता मात्र संघाकडून थेट पदक जिंकण्याचा विचार होत आहे. भारताचा संघ अत्यंत मजबूत असून मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.’