- रोहित नाईक, मुंबईविस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने केलेल्या तुफानी नाबाद शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दणदणीत विजयी सलामी देताना इंग्लंडचा ६ विकेटनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, टी-२०मध्ये दुसऱ्यांदा शतक झळकावलेल्या गेलने याआधी २००७मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेतही सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. दुसरीकडे विंडीजच्या महिलांनी पाकिस्तानचा ४ धावांनी पराभव केला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या धमाकेदार सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गेलने ४८ चेंडूंत नबाद १०० धावांची धुवाधार खेळी केली. त्याने ५ चौकार व तब्बल ११ षटकार खेचताना वेस्ट इंडीजला एकहाती सामना जिंकून दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे, सलग ७व्या सामन्यात इंग्लंडने १७०हून अधिक धावा केल्या होत्या; मात्र गेल वादळापुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या गेलने १६ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २२ धावा काढल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेऊन इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. विंडीजच्या डावातील सर्वच्या सर्व, ११ षटकार एकट्या गेलने खेचताना इंग्लंडची हवाच काढून घेतली. पॉवर प्लेमध्ये इंग्लंडने काही प्रमाणत विंडीजला रोखले. मात्र, त्यानंतर गेलने संपूर्ण सामनाच फिरवला. मार्लन सॅम्युल्सनेही २७ चेंडूंत ८ चौकारांसह ३७ धावांचा तडाखा दिला. गेलविरुद्धचा अपवाद वगळता इंग्लंडच्या गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळविले होते.तपूर्वी, प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर जो रुट व अॅलेक्स हेल्स यांच्या जोरावर इंग्लंडने आव्हानात्मक मजल मारताना वेस्ट इंडीजविरुद्ध ५ बाद १८२ अशी धावसंख्या उभारली. अखेरच्या क्षणी जोस बटलर व कर्णधार इआॅन मॉर्गन यांच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडला मजबूत धावसंख्या गाठण्यात यश आले.जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स यांनी ३७ धावांची सलामी देऊन इंग्लंडला सावध सुरुवात करून दिली. आंद्रे रसेलने रॉयला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर आलेल्या जो रुटने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना हेल्ससह इंग्लंडच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी ५५ धावांची वेगवान भागीदारी करून इंग्लंडला सावरले. रुटने ३६ चेंडंूत ३ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा फटकावल्या. तर, बटलर (२० चेंडूंत ३० धावा) आणि इआॅन मॉर्गन (१४ चेंडंूत नाबाद २७ धावा) यांनी दमदार फटकेबाजी करताना इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून दिली. आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २ बळी घेताना इंग्लंडला रोखण्याचा प्रयत्न केला. संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : २० षटकांत ५ बाद १८२ धावा (जो रुट ४८, जोस बटलर ३०, इआॅन मॉर्गन नाबाद २७; आंद्रे रसेल २/३६, ड्वेन ब्राव्हो २/४१) पराभूत वि. वेस्ट इंडीज : १८.१ षटकांत ४ बाद १८.१ षटकांत १८३ धावा (ख्रिस गेल नाबाद १००, मार्लन सॅम्युल्स ३७, आदिल रशीद १/२०, रीस टोपले १/२२) महिला विंडीज संघाकडून पाक पराभूतचेन्नई : कर्णधार स्टेफनी टेलरची (४८ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावा) आक्रमक फलंदाजी आणि नंतर आॅफ स्पिनर अनिसा मोहंमदच्या (३/२५) भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीज महिला संघाने ग्रुप बी मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना विंडीज महिलांनी ८ बाद १०३ धावा केल्या. पाकचा डाव ५ बाद ९९ धावांवर संपुष्टात आला.
वानखेडेवर ‘गेल’ वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 3:54 AM